गुर्मी दाखवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांसमोर आपल्या स्वतःच्या व संस्थेच्या धोरणांबद्दल ठाम उभे राहिल्याबद्दल मॅडमचे कौतुक करावे तितके थोडेच. आणि तेव्हढेच कौतुक त्या शिक्षण संस्थेचेही. लेखात दर्शवल्याप्रमाणे मॅडम ह्या संस्थेत अनेक वर्षे कार्यरत आहेत. तेव्हा त्यांना तिथे असे धैर्य दाखवतांना संस्था आपल्या पाठीशी उभी राहिल ह्याची खात्री असणार. (असे म्हणतांना त्यांच्या ह्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याचा अजिबात हेतू नाही). म्हणूनच अभिनंदन मॅडम आणि संस्था ह्या दोघांचेही. आणि त्याचबरोबर त्या दोघांना शुभेच्छा-- पुढील संकटांना तोंड देण्यासाठी.  गुंडगिरी, झुंडगिरी, खाबूगिरी व अधिकाराचा गैरवापर करण्यात कसलीही बूज न राखणारी राजकीय व नोकरशाहीची शक्ति, ह्या सर्वांपुढे खंबीरपणे उभे राहून आपले कार्य करणे ह्याला अतुलनीय बळ लागते. आमच्यासारखी सर्वसाधारण जनता सहजपणे 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' वगैरे म्हणत असते पण पुढे जे काही झेलायचे असते, जे सोसायचे असते, ते त्या 'पुढे' असलेल्या व्यक्तिंनाच.