मराठी ही संस्कृतपासून निर्माण झाली हे नक्की. (विश्वनाथ खैरे यांच्या मते मराठी संस्कृतपेक्षा जुन्या अशा तामीळपासून निर्माण झाली. आणि संस्कृत भाषा तसेच हिंदी भाषा या मराठीपासून उत्क्रान्त झाल्या.  पण या मताला बहुसंख्य तज्ज्ञांचा पाठिंबा नाही.)

वैदिक संस्कृतमध्ये ळ आणि ळ्ह ही दोन्ही व्यंजने होती. त्यातला ळ मराठी-गुजराथीसकट सर्व दक्षिणी भारतीय भाषांत आहे, आणि ळ्ह तामीळ, मलयालम आणि सिंहली भाषांत आहे.  वेदोत्तर काळात ळ चा ड आणि ळ्ह चा ढ झाला.

ऋ चा मूळ संस्कृत उच्चार काय होता हे सांगणे कठीण आहे.  तो उत्तरी भारतीय करतात तसा रि च्या जवळ आहे का मराठी करतात तसा रु च्या जवळचा. की दोघांच्या मधला? तसेच ज्ञ चा खरा उच्चार बंगाली करतात तसा ज्‌ञ, की मराठी करतात तसा ज्ञ की हिंदी भाषक करतात तसा ग्य?

या सर्व वादात पडायचा आपल्याला काही कारण नाही.  मराठी ही संस्कृतपासून झाली आहे, तिच्यात अनेक शब्द संस्कृतसारखेच आहेत, किंवा जवळजवळ तसेच आहेत, त्यार्थी संस्कृतचे शब्द बनवण्याचे आणि व्याकरणाचे नियम मराठीत असले तर त्यात काही विशेष नाही. तसे ते असणारच असे समजले की काही बिघडत नाही.