च आणि च्य किंवा ज आणि ज्य हे दोन वेगवेगळे उच्चार ही फार्सी भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी असावी असे वाटते. देवनागरी लिपीमध्ये अक्षर किंवा ग्लिफ हे उच्चाराला रोमन भाषांच्या तुलनेने अधिक बांधलेले असते असे वाटते कारण देवनागरी भाषेत एखादा शब्द लिहिलेला असल्यास त्याचा उच्चार नक्की कसा करावा याबाबतीत तुलनेने कमी प्रमाणात दुमत आढळते. पण रोमन भाषांमधे(दुर्दैवाने फक्त इंग्रजीचाच अनुभव आहे. आणि हो रोमन भाषा नाही तर रोमन लिपी वापरून लिहिल्या जाणाऱ्या भाषा. चुभूद्याघ्या) स्पेलिंग वाचूनही तो शब्द नक्की कसा म्हणावा हे माहीत नसल्यास गोंधळ उडू शकतो. उदा. जीवशास्त्राच्या पुस्तकातला mitochondria हा शब्द (हा बहुधा इंग्रजी नसावा पण रोमन लिपीचे उचाहरण म्हणून चालून जाईल.) मी सुरुवातीला मिटोचॉंड्रिया असा वाचला होता. त्याचा मायटोकाँड्रिया हा उच्चार नंतर कळल्यावर मला स्वतःचेच खूप हसू आले होते.
तर सांगण्याहोगा मुद्दा असा की शुद्धलेखन आणि शब्दोच्चार हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. त्यामुळे च आणि च्य हे उच्चारी फरक दाखवण्यासाठी सर्वानुमते वेगळी ग्लिफ्स वापरता येऊ शकतात. त्यासाठी व्याकरण आणि शुद्धलेखन या दोन आधारभूत गोष्टी रद्दबातल ठरवायची काहीच गरज नाही. व्याकरण - शुद्धलेखनाच्या तथाकथित जोखडातून मराठी भाषा मुक्त झाली तर तिचा प्रसार जास्त होईल असे आपणांस खरोखरीच वाटते काय? सामान्यपणे संभाषणातून परस्परांना अर्थबोध होण्यासाठी एक कॉमन ग्राउंड म्हणून व्याकरण - शुद्धलेखनादी गोष्टींचा उपयोग होतो. त्यांच्याशिवाय संभाषण कठीण जाते. आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र मताने आणि आपल्या सोयीप्रमाणे भाषेचे नियम इ. वापरायचे ठरवले तर सर्व जगाला कळणारी जी एकमेव भाषा (देहबोली वगळता) म्हणजे हास्याची भाषा तीच वापरून दिवस कंठावे लागतील.
जेंव्हा कोणताही माणूस एखादी भाषा आत्मसात करतो तेंव्हा त्याला कष्ट सोसावे लागतात. जोवर ती भाषा अंगवळणी पडत नाही तोवर हे कष्ट सोसण्याला काही पर्यायच नसतो. या कष्टांवर व्याकरण-शुद्धलेखनाचे नियमच रद्द करणे हा उपाय होऊ शकत नाही असे मनापासून वाटते.
लोक भाषा हवी तशी वापरत असतील तर त्यांनी ती भाषा नीट वापरावी यासाठी आग्रह धरणे जास्त सयुक्तिक वाटते. जी भाषा बोलली जाईल ती व्यवस्थित वापरली जावी एवढा माफक आग्रह धरल्यास हे साध्य होऊ शकते.
याच न्यायाने उद्या गोऱ्या साहेबाला "आम्हाला शुद्धलेखन -व्याकरणाचे नियम मान्य नाहीत तरी आम्ही आजपासून या नियमांना धाब्यावर बसवून इंग्रजी भाषा वापरू" असं उर्मट उत्तर देणं कोणाला स्वप्नातही शक्य होणार नाही आणि यदाकदाचित ते दिलंच, तर त्याचा परिणाम साहेबी देशांकडून काम घेणाऱ्या कॉल सेंटर्स च्या कामावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर किती मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे मयमराठी ही 'कंट्री' लोकांची गरीब भाषा आहे एवढ्यासाठी (पैशांचे व्यवहार कमी निगडित असतात...) कसायाला गाय धार्जिणी असल्यासारखी आपल्या ताब्यात आहे असं समजून तिचं वाट्टेल ते केलं तरी चालेल अशा भ्रमात राहून चालणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते.
कुठलीही भाषा हे सरस्वतीचं साक्षात रूप असल्यामुळे ती दैवीच असते. दोन भाषांमध्ये श्रेष्ठ - कनिष्ठ ठरवण्यापेक्षा , सर्व भाषा यथायोग्य आदराने वापरून त्यांचं पावित्र्य जपणं हे जास्त उत्तम असंही वाटतं.
--अदिती