संस्कृत ही अतिशय सुंदर भाषा आहे ह्यात वाद नाही. (इथे संस्कृतची इतर भाषांशी तुलना नाहीये. इतर भाषा आपल्या जागी आणि संस्कृत आपल्या जागी!)
प्राचीन भारतात संस्कृत ही बोली भाषा म्हणून वापरत असत की नाही हा थोडासा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण जरी अनेक धार्मिक/वैज्ञानिक ग्रंथ संस्कृतात असले तरी असे आढळून येते की अनेक संस्कृत नाटकांमध्ये संस्कृतासोबत प्राकृतदेखील वापरली जाते. एक असे निरीक्षण आहे की अनेक नाटकांमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्यांच्या तोंडी संस्कृत आणि स्त्रिया व शूद्रांच्या तोंडी प्राकृत असायची. (किंबहुना एका नाट्यशास्त्रकाराच्या नाट्यशास्त्रात तसा नियमच होता. नाट्यशास्त्रकाराचे नाव आठवत नाही, कृपया माहितगारांनी मार्गदर्शन करावे.)
त्यातही ही बोली संस्कृत म्हणजे नक्की कोणती? वैदिक संस्कृत की अभिजात (Classical) संस्कृत? कारण दोन्हीमध्ये फरक आहे. वैदिक काळापासून संस्कृत बरीच बदलली. बऱ्याच गोष्टी वापरातून नाहीशा झाल्या. (उदा. अनेक संस्कृत सूक्तांमध्ये येणाऱ्या स्वरांच्या खुणा) पण कालांतराने संस्कृतचे व्याकरण अधिकाधिक दृढ होत गेले आणि कालांतराने ते जडशीळ झाले. एखादी भाषा बोलीभाषा म्हणून जिवंत राहण्यासाठी तिच्यात कालानुरूप बदल होणे अत्यावश्यक आहे. तसे बदल संस्कृतात फारसे झाले नाहीत आणि एक बोलीभाषा म्हणून ती लोप पावली.
आयुर्वेदादी विद्याशाखांच्या अभ्यासासाठी संस्कृताचा निश्चितच फायदा होतो. पण प्रश्न असा आहे की केवळ त्यासाठीच पहिलीपासून संस्कृत शिकवणे किती शहाणपणाचे ठरेल. इथे पहिलीपासून इंग्लिश शिकवण्याच्या प्रस्तावावर केवढा गहजब झाला होता विसरलात का? इंग्लिश येणे ही निश्चितच काळाची गरज आहे. कारण उपलब्ध वैज्ञानिक लिखितसाहित्य हे बहुतांशी इंग्लिशमध्येच उपलब्ध आहे. (अर्थात् ते इतर भाषांमध्येही उपलब्ध आहे. पण त्या भाषा फ्रेंच, जर्मन वगैरे असल्याने त्यांच्याऐवजी इंग्लिश शिकणेच हिताचे ठरेल ह्याबाबत दुमत नसावे.) जागतिक व्यवहार (केवळ विज्ञानच नव्हे तर वाणिज्यदेखील!) हादेखील बहुतांशी इंग्लिशमध्येच चालतो. संस्कृत ही काळाची गरज बनण्यास असे काही कारण नाहीये.
संस्कृतचा उदय भारतातच झाला की नाही ह्याबद्दलदेखील दुमत असू शकेल. पण संस्कृत ही लिहिल्याप्रमाणे वाचली जाणारी ही एकमेव भाषा आहे आणि म्हणून संगणकास अतिशय उपयुक्त व अत्यंत जवळची आहे हे वाक्य माझ्या मते तरी 'स्यूडो-सायन्स'टाइप आहे. संस्कृत आणि संगणक ह्या दोन्ही गोष्टी न जाणणाऱ्या लोकांनी असा गैरसमज पसरवून ठेवला आहे. थोडासा विचार केला तरी एक गोष्ट लक्षात यावी की संगणकाचे काम हे 'बायनरी'मध्ये चालते. त्याच्याशी संस्कृतच काय पण इंग्लिश, फ्रेंच किंवा ऍरगॉनिज़ ह्या भाषांचादेखील संबंध नाही. ज्याला 'हाय लेवल लँग्विज' म्हणतात त्या जावा, सी++, .नेट वगैरेंचादेखील जेव्हा विचार करतो तेव्हा त्यादेखील जर्मनस्पॅनिशादी भाषांपेक्षा कितीतरी भिन्न आहेत. इथे (आणि इतर अनेक ठिकाणीदेखील) नैसर्गिक (किंवा मानवी) भाषा आणि संगणकाची भाषा ह्यांत गल्लत होते आहे. ह्या दोन प्रकारांतल्या भाषांची तुलना होऊच शकत नाही. 'जावा'मध्ये आढळणारी OOP (Object Oriented Programming) ही संकल्पना संस्कृतच नव्हे तर इतर कोणत्याही नैसर्गिक भाषेत येत नाही. कारण मुळात मानवाला बोलण्यासाठी अशा कोणत्याही संकल्पनेचा आधार घेण्याची गरज नाहीये. तेव्हा संस्कृत ही संगणकासाठी उत्तम भाषा असल्याचा दावा करणारे तथाकथित तज्ज्ञ हे एखाद्या वैदूइतकेच भंकस आहेत असे मला तरी वाटते. (मध्ये मॅग्नेटिक थेरपी नावाचं असंच एक बकवास फॅड निघालं होतं ज्यात रक्तातील लोह हे लोहचुंबकाने आकर्षून घेऊन रक्ताभिसरण सुधारण्याचा दावा केला होता.)
पण दुर्दैवाने हे मात्र शक्य आहे की पाश्चात्त्य (आता केवळ पाश्चात्त्यच नव्हे तर जपानादी पौर्वात्यसुद्धा) देशांनी संस्कृतचे कोडकौतुक करेपर्यंत आपल्याला संस्कृतमध्ये गोडी उत्पन्न होणार नाही. एखाद्या आपल्याच गोष्टीचं अंगडं-टोपडं काढून तिला जीन्स-टी-शर्ट चढवल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला हवीशी वाटत नाही. कारण तोवर तिला 'स्टेटस' मिळत नसतो.
संस्कृत ही काळाची गरज असो अथवा नसो, आपल्याला संस्कृत शिकण्यासाठी अनेक सोयीसुविधा (चांगले संस्कृतजाणकार) सहजपणे उपलब्ध असताना त्यांचा वापर न करणं योग्य ठरणार नाही. ज्यांना साहित्यात रस आहे त्यांनी संस्कृत नाटकं, कादंबऱ्या आणि महाकाव्य वाचण्यासाठी संस्कृत शिकावी. ज्यांना आयुर्वेदाचा अभ्यास करून काही संशोधन करायचे आहे (जे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर आपण उगाच चारदोन ज्ञानकणांवर आयुर्वेदाची टिमकी मिरवत असतो) किंवा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी त्यासाठी संस्कृत शिकावी. ज्यांना वेगवेगळ्या भाषा शिकायच्या आहेत त्यांनी एक भाषा म्हणून संस्कृत शिकावी. कारणं काहीही असोत. संस्कृत शिकण्यास मुबलक संधी असल्याने तिचा वापर करावा. संस्कृतचे जतन करण्यासाठी तिचं ओझं पहिलीपासून वगैरे मुलांच्या अंगावर लादणं यासारखं क्रौर्य नसेल.