हिंदीमध्ये संस्कृत शब्दांचा बरेच वेळा विपर्यस्त वापर केला जातो असे माझे मत आहे. त्यामानाने मराठीतला वापर मला अधिक प्रामाणिक वाटतो.

असे नाही.  हिंदीत अनेकदा मूळ संस्कृत अर्थ गृहीत धरला जातो, मराठीत आपण अनेकदा अर्थ बदलून घेतो.  उदाहरणार्थ : संस्कृतमध्ये दर्शक म्हणजे पाहणारा किंवा दाखवणारा. मराठीत (फक्त) दाखवणारा आणि हिंदीत (फक्त) पाहणारा.

हिन्दी-संस्कृतमध्ये शासन म्हणजे आज्ञा, अंमल, लिखित पट्टा, दान दिलेली भूमी, संयम, अधिकार, दंड(फक्त हिन्दीत) वगैरे.  मराठीत सजा, अंमल आणि सरकार.

शिक्षा म्हणजे हिंदी-संस्कृतात शिक्षण, अभ्यास वगैरे. मराठीत सजा.

हिंदी-संस्कृतात दंड म्हणजे सजा किंवा काठी. मराठीत काठी किंवा जुर्माना(आर्थिक सजा).

संस्कृतमध्ये अंतर्‌ हा प्रत्यय आहे, त्यामुळे हिंदीत अंतर्राष्ट्रीय(र अर्धा) म्हणजे इंटरनॅशनल. तसे अंतर्देशीय म्हणजे देशांतर्गत आणि इंटरनॅशनलसुद्धा. मराठीत हा घोटाळा नाही, अंतर्देशीय म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय(र पूर्ण) म्हणजे इंटरनॅशनल. संस्कृतमध्ये अंतरी(रि)क्ष (नाम) म्हणजे अंतराळ आणि आन्तरी(रि)क्ष (विशेषण) म्हणजे अंतराळासंबंधी.

हिंदीत मराठीप्रमाणेच आंतरजातीय, आंतरखंडीय, आंतरफसल, आंतरविवाह, आंतरजाल, आंतरकाश्त(=आंतरमशागत), आंतरकर्ण हे शब्द आहेत. इथे अंतर्‌ प्रत्यय नाही.

अपवाद म्हणून, मराठीतसुद्धा 'इंटर्नल'चे भाषांतर ('इंटर' असूनही) अंतर्गत होते, आंतरगत नाही.