त्यामुळेच असे वाटते थोडेसे विषयांतर झाले आहे. (गैर नाही परंतु.... )
गैरविषयांतर नाही ना? मग झालं तर! प्रस्तावकाने जो विषय मांडला त्या विषयासंदर्भात जोवर चर्चा सुरू आहे तोवर काही हरकत नसावी असं मला वाटतं. आपण मूळ लेखात मांडलेल्या मुद्द्यांवरून तरी असं वाटत नाही की संस्कृत अध्ययन हाच फक्त चर्चेचा विषय होता. असं असतं तर संस्कृत ही पुरातन, सनातन आदिभाषा आहे की नाही ह्याचा उल्लेख आपल्या लेखात आला नसता.
सर्वात प्राचीन भाषा आहे की नाही याबद्दल आपण दिलेले संदर्भ: -
१) विद्यापीठ आयोगाने ठरविलेली पुस्तके: - पुस्तकांची नावे दिल्यास ह्या संदर्भाला अर्थ आहे.
२) दि वेदिक फाउंडेशन: - ह्यांच्या 'अबाउट अस' सदरात पाहिले असता असे जाणवले की हे फाउंडेशन ऐतिहासिक घटनांची सत्यासत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे मानत नाही. त्यांच्या दृष्टीने धार्मिक श्रद्धा अधिक महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे ह्या संकेतस्थळावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
३) लॉयल इंड्या: - आपण दिलेल्या दुव्यातील लेख हा नासाचा अधिकृत लेख वाटत नाही. त्यामुळे विश्वासार्ह वाटत नाही.
सर्व भाषेची जगत जननी आणि प्राचीन युगात संस्कृत हि बोली भाषा म्हणून वापरत असत: -
इथेदेखील आपण दिलेले संदर्भ हे वरील संदर्भच असल्याने अपुरे वाटतात आणि विश्वासार्ह वाटत नाहीत.
नुकत्याच जगप्रसिद्ध तज्ज्ञांच्या मते संगणकास अतिशय उपयुक्त व अत्यंत जवळची अशी भाषा म्हणजेच "संस्कृत ": -
दुवा क्र. १: - पहिली गोष्ट, की ह्या लेखातील संशोधन हे 'नुकतेच' वगैरे झालेले नाहीये. तर ते १९८५ साली म्हणजे तब्बल २३ वर्षांपूर्वी झाले आहे. दुसरी गोष्ट, हा लेख नासाचा अधिकृत लेख वाटत नाही. नासाच्या स्वतःच्या संकेतस्थळावर दुवा क्र. १ हा एक जुना रिसर्च रिपोर्ट (आर्काइव मध्ये) सापडला. ज्याच्यात 6.6. Artificial Intelligence: Natural Language Processing हे प्रकरण (ह्या प्रकरणाचे लेखक हे आपण दिलेल्या संकेतस्थळावर नमूद केलेले श्रीयुत् रिचर्ड ब्रिग्ज़ हेच आहेत असे वाटते) आपण मांडलेल्या मुद्द्याच्या जवळ जाणारे आहे. पण मला तरी त्यात संस्कृत भाषेचा उल्लेख कुठेही आढळला नाही. मग ह्याच लेखाचा आधार घेऊन जगप्रसिद्ध तज्ज्ञांच्या मते संगणकास अतिशय उपयुक्त व अत्यंत जवळची अशी भाषा म्हणजेच उर्दू असे म्हणता येईल का?
त्याउपर त्याच प्रकरणातील प्रास्ताविक आपल्या माहितीसाठी खाली देत आहे.
Problem Overview. A natural language processor is a system that can understand and intelligently respond to natural language input. For this problem,
solution techniques. algorithm designs, and performance statistics are under active research and final results are unavailable.
इथे स्पष्टपणे लिहिले आहे की (विश्वासार्ह) निष्कर्ष उपलब्ध नाही आहेत.
'संस्कृत आणि संगणक ह्या दोन्ही गोष्टी न जाणणाऱ्या लोकांनी असा गैरसमज पसरवून ठेवला आहे.' ह्या मुद्द्याला प्रतिवाद करण्यासाठी आपण जी संकेतस्थळे दिली आहेत ती बिल्कुल विश्वासार्ह वाटत नाही कारण ते केवळ फोरम आहेत जिथे कोणीही यावं आणि काहीही लिहावं. त्यातही, दुवा क्र. २ मधील लेखकाला बहुतेक रोमन/ग्रीक एटिमॉलजी माहीत नाहीये. त्यामुळे त्याला गौ ह्या शब्दावरून जसा गम् हा 'क्लास' सापडला तसा 'इन्सॉम्निआ' ह्या शब्दावरून 'सॉम्ना' म्हणजे झोप हा 'क्लास'सुद्धा सापडला असता. त्यावरून 'सॉम्निफरस' म्हणजे 'स्लीप-इंड्यूसिंग' (झोप आणणारे, जसे एखादे व्याख्यान) आणि 'सॉम्नॅम्ब्युलिज़म' म्हणजे 'स्लीप-वॉकिंग' (झोपेत चालणे) हे शब्ददेखील सापडले असते. हा म्हणजे केवळ सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार आहे.
संस्कृत हे सर्वच शिकले किंवा शिकविले पाहीजे असे थोडीच आहे.
आपण स्वतःच स्वतःच्या मुद्द्यांना विरोध करीत आहात असे वाटते.
कोणतीही भाषा शिकताना किंवा शिकविताना त्याचे महत्त्व व उपयोग लक्षात घेतले पाहीजेत.
बरं झालं आपल्याला महत्त्वाचा मुद्दा कळला!
जसे संस्कृतमुळे वाचा शुद्धी होते ( उच्चार ) तसेच उपयुक्त संस्कृत मंत्रांमुळे मन शुद्धी होते.
कसली वाचाशुद्धी आणि उच्चारशुद्धी? मराठीभाषिक असलेला संस्कृतपंडित 'ऋ'चा किंवा 'ज्ञ'चा उच्चार कसा करतो ते पाहा आणि एखादा हिंदीभाषिक संस्कृतपंडित ते उच्चार कसा करतो ते पाहा. आणि कसली आली आहे मनःशुद्धी? तो फक्त श्रद्धेचा परिणाम असतो. संस्कृतच काय, कोणत्याही भाषेबद्दल असा आदरभाव (नाही... अत्यंत गाढ श्रद्धा) मनात असेल तर त्या भाषेतील कोणतीही गेय (एक ताल मिळावा म्हणून गेय, नाहीतर कोणतीही) रचना मनःशुद्धी करू शकते.
म्हणूनच मला वाटते कामापुरते का असेना पण संस्कृत अध्ययन हे केलेच पाहीजे
अगदी बरोबर! पण ज्यांना संस्कृतशी काही कामच नाही त्यांच्यावर सक्ती कशाला?
जाताजाता: - पुराव्यादाखल संदर्भ देताना त्यांच्या विश्वसनीयतेबद्दल आधी स्वतः खात्री करून घ्यावी.