सर्वप्रथम, लेखाचा आवाका आणि हेतू चांगला आहे हे नोंदवतो. आणि लेखकाच्या मूळ मुद्द्यात थोडी बाजूबाजूने भर घालतो.
'कम्युनल' आणि 'सेक्युलर' हे शब्द अत्यंत अजागळपणे वापरण्याची वहिवाट पडून गेली आहे. त्यात 'कम्युनल'चे भाषांतर 'जातीयवादी' असे केले जाते, आणि 'सेक्युलर'चे धर्मनिरपेक्ष. (संदर्भ - पाहा कोणतेही वृत्तपत्र, आणि त्यातील 'जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी' आणि 'धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकजुटीसाठी' ही पोपटपंची)
MY (मुस्लिम आणि यादव) असे उघड समीकरण मांडणारे लालूप्रसाद यादव सेक्युलर. गुजरातेत KHAM (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम) असे उघड समीकरण मांडणारे काँग्रेसचे माधवसिंह सोळंकी सेक्युलर. लातूरमध्ये मामुली (मारवाडी, मुस्लिम, लिंगायत) असे उघड समीकरण मांडणारे शिवराज पाटील सेक्युलर. आणि 'जातीला थारा देत नाही' असे उघडपणे सांगून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस करणारी शिवसेना कम्युनल. {येथे ब्राह्मणांची भलावण करण्याचा उद्देश अजिबात नाही. पण लोकसंख्येत जेमतेम तीन टक्क्यांपर्यंत असलेल्या जातीला मुख्यमंत्री करणे हे निवडणुका लढवणाऱ्या पक्षासाठी निश्चितच धाडस म्हणावे लागेल}.
या अशा (वृत्तपत्रांसह सर्व माध्यमांनी) रेटून चालवलेल्या अतार्किक नामकरणामुळे घोटाळे होतात. 'सेक्युलर' हा शब्द भारतातल्या राजकीय पक्षांकरिता कायमचा रद्दबातल करून सर्वजण 'कम्युनल' आहेत हे एकदा मान्य करून टाकावे हे बरे. मग ते स्वतःला काहीही समजोत. नाहीतरी कुणी स्वतःला काय समजावे आणि सत्य परिस्थिती काय आहे याचा अर्थाअर्थी संबंध असण्याची गरज नसतेच!