प्रथम हे स्पष्ट करतो की शेतकऱ्यांच्या दारुण परिस्थितीची मला प्रत्यक्ष झळ पोचली आहे. त्यामुळे सहानुभूती वगैरे सोडाच, पण या वेदनांचा मी एक साक्षात बळी - व्हिक्टिम या अर्थी - आहे. पण तरीही काही मोठे, भव्य, विशेषतः जिथे पैसा ओतला जातो असे दिसले की 'आधी गरीबांचे बघा' असा समाजवादी आक्रोश सुरू होतो याचे मला नवल वाटते. गरीबांचे आहेच आयुष्यभर लागलेले. येशूच्या पायावर कुणीतरी (मला वाटते मेरी मॅक्डॉलिनने) अत्तर लावले तेंव्हाही 'या पैशातून गरीबांना मदत करता आली नसती का? ' असे विचारण्यात आले होते. येशूने तेंव्हा दिलेले उत्तर रंजक आहे. येशू म्हणाला, 'गरीबी ही कायम आहेच, मी आणि मेरी आज आहोत, उद्या नाही. त्यामुळे तिला जे आज करायचे ते करू द्या..'

जरा कुठे थाटामाटात एखादा समारंभ झाला  की त्यासाठीच टपून बसलेले कळकळीचे कार्यकर्ते ताबडतोब वर्तमानपत्रांकडे धावतात. "हा सारा पैसा गोरगरिबांसाठी खर्च करता आला नसता का? " बरे, इतके करूनही गोरगरिबांचे लचांड एकदा कायमचे निकालात निघाले असते तरी हरकत नव्हती. ते अनादिकालापासून आहे, अनंतापर्यंत राहणारच. गोरगरिबांना मदत करायलाच आपण जन्मलो, तर मग ते गोरगरिब कशासाठी जन्मले आहेत? आमची मदत घ्यायला! छान, म्हणजे छातीत खुपसायला सुरी, व सुरी खुपसण्यासाठी छाती! त्यात आपण अत्यंत बुद्धीवादी अशी आपली समजूत. 
वरील वाक्ये कुठली, कुणाची हे सांगायला नकोच!