संदिप,

हे तुम्ही स्वतः अनुभवलं आहे का?

जळगांव जिल्ह्यातील एका मोठ्या तालुक्याच्या शासकीय रूग्णालयात मी काही वर्षांपूवी वैद्यकिय अधिकारी होतो. तुम्ही लिहीलंत यापेक्षाही खूप ओंगळवाणं असं भ्रष्टाचाराचं रूप तिथे पहायला मिळालं. रूग्णालयाच्या प्रत्येक कामकाजात स्थानिक स्वार्थी, निर्लज्ज पुढाऱ्यांचा असणारा हस्तक्षेप ऊद्विग्न करणारा असाच होता. अवघ्या दोन महिन्यांत मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्या दोन महिन्यांत एकूणच या व्यवस्थेचा मुखवटा आणि त्या मागचा भीषण चेहरा दिसला.  शासकिय वैद्यकीय सेवेमध्ये किंबहुना बहुतेक शासकिय विभागांमधे हा असाच अनागोंदी कारभार सुरू आहे. माझ्या अनुभवांनुसार, हा भ्रष्टाचार स्थानिक नेते (ज्यांची स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू शकते), भ्रष्ट अधिकारी आणि त्यांचे बडे वरदहस्त यांच्या संगनमताने सुरू असतो. याची पूर्ण कल्पना स्थानिक लोकांना सुद्धा असते. पण आपल्याकडे याला अलिखित मान्यता मिळाली आहे. एखाद्याला लूटणं हे गैर नाही तर लूटताना पकडलं जाणं हे मात्र गैर आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेली व्यक्ती तोंड लपवते, मात्र पैसे खाताना नाही.

मी आज अमेरिकेत आहे.  मी इथे असण्याला कदाचित अशा स्वरूपाची निराशाजनक सामाजिक परिस्थितीसुद्धा जबाबदार असेन. ह्यालाच आपण 'ब्रेनड्रेन' म्हणतो. पण ब्रेनड्रेन च्या नावाने खडे फोडणाऱ्या शासनाला मूळ व्याधीवर रामबाण उपचार नको आहेत!!! मला तरी असंच वाटतं की ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढच्या कित्येक पिढ्यांची कसून मशागत करावी लागणार........काळरात्र दीर्घ आहे........

आकाश...