एखाद्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप केले तर नराची मादी व्हायलाच पाहिजे असे नाही. डबा-डबी,  ताट-ताटी, घाट-घाटी, पाट-पाटी.  या उलट, अनेक शब्द नरवाचक असले तर त्यांची मादीवाचक रूपे होतच नाहीत. ससा, पण सशी नाही; मुंगी, पण मुंगा नाही; माशी, पण माशा नाही.  लेखिका म्हणजे स्त्री लेखक, पण डॉक्टरीण ही स्त्री-डॉक्टरच असेल असे नाही. तसेच प्रोफेसरीण ही प्राध्यापिका नसू शकेल, नव्हे तशी ती साधारणपणे नसतेच! नायक-नायकीण यांचा तर एकामेकांशी कुठलाही संबंध नसू शकतो. त्यामुळे मराठीतली,  अभ्यासकपासून  अभ्यासिका, पालकपासून पाली किंवा पालिका, मालक किंवा मालापासून मालिका ही मूळ शब्दाची स्त्रीलिंगी रूपेच नाहीत.