कधीकधी काही खेळाडू विरोधी खेळाडूंचा तोल जावा म्हणून शिव्यांच्या 'योग्य' वेळी वापर करत असतात. हा आता खेळसंस्कृतीचाच भाग झाला आहे. मॅटरेझी आणि झिदान ह्या खेळाडूंमध्ये काय घडले हे आणि सायमंडला
बघून काही भारतीय प्रेक्षकांनी केलेले माकडचाळेही आठवत असतीलच. स्थानिक
पातळीवरही अशा घटना घडत असतात. कराडला आमच्या महाविद्यालयाच्या फुटबॉलच्या
चमूत अरुणाचल, मेघालय आदी राज्यांतली मुले होती. खेळत
असताना, विशेषतः आमचा संघ जिंकू लागला की , ह्या मुलांना 'नेपाळ्या' आणि तत्सम प्रकारची
अतिशय हिणकस शेरेबाजी विरोधी खेळाडूंकडून आणि त्यांच्या समर्थकांकडूनही
ऐकावी लागत असे.
माझा एक सुदानी परिचित होता. त्याचे नाव लसूबा. धर्माने ख्रिश्चन. हा
त्याकाळी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात शिकत होता. ह्या
लसूबाला त्याच्या रंगरूपावरून काही हलकी टाळकी मराठी-हिंदीत हिणवत असत. पण
लसूबा बर्यापैकी मराठी हिंदी बोलत असे. 'मी डोलकर डोलकर, डोलकर, दर्याचा
राजा' हे गाणे आपल्या खास आफ्रिकन शैलीत, हसत-नाचत, अगदी स्वाहिलीतले एखादे गाणे
असल्यासारखे, जेव्हा तो गात असे तेव्हा आम्हाला भारी मौज वाटत असे, आनंद
होत असे. असो. तर हा जेव्हा ह्या हलक्यांना मराठीतून किंवा हिंदीतून त्यांच्याच
भाषेत प्रत्युत्तर द्यायचा तेव्हा त्या लोकांचे पडलेले चेहरे फार देखणे
वाटायचे. नंतर लसूबाने एका स्थानिक ख्रिश्चन मुलीशी लग्न केले. श्री॰ व सौ॰ लसूबा सध्या कॅनडात स्थायिक झाले आहेत, असे कळते.