गोऱ्या कातडीसमोर लाळघोटेपणा करणे ही भारतीयांची जवळपास दोनशे वर्षांची मानsickता आहे आणि तिचा प्रत्यय आजही सर्व पर्यटनस्थळे आणि हॉटेले या ठिकाणी येत असतोच असतो. मध्यंतरी ताजमहालाचे तिकीट फक्त भारतीय रुपयांमध्येच काढता येईल असा सरकारी निर्णय जाहीर झाल्यावर आपल्या सरकारचा मला प्रचंड अभिमान वाटला होता (असे प्रसंग विरळाच)
परकीयांच्या मर्जीत राहण्यासाठी स्वकीयांचा घात करण्याची वृत्ती आपल्या समाजात अगदी खोलवर भिनली आहे. यात आपला देश, आपला समाज, आपली संस्कृती (म्हणजे भोजनप्रकार, चालीरीती इ) यांच्याबद्दल आपल्याला वाटणारा न्यूनगंड हे बहुधा प्रमुख कारण असावे. मला वाटतं ही मानसिक गुलामगिरी आहे आणि ती बहुधा कधीच नष्ट होणार नाही.
'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वह भारत देश है मेरा ' अशी गर्जना करत सर्व जगात आपल्या श्रीमंतीने आणि कर्तृत्वाने तळपणाऱ्या याच भारत देशाबद्दल याच पाश्चात्य लोकांना इतका आदर वाटत असे की ते लोक तीन चारशे वर्ष त्याच भारताच्या शोधात भटकले हे आपल्या इतिहासात कधीच का शिकवलं जात नाही?
माझ्या परिचयाच्या एका इझरायलच्या विद्यार्थ्याला रूपालीमधले जेवण विलक्षण आवडते. हा माणूस जर्मन म्हणून खपावा इतका गोरा आहे. एका आनंदाच्या प्रसंगी त्याला घेऊन रूपालीमध्ये गेले असताना तिथले वाढपी 'गोरा माणूस पुरी कसा काय खातो' हे नवलाने बघत असलेले पाहून मलाच मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं.  तो मात्र पूर्ण ब्रह्म असलेल्या स्वदिष्ट अन्नावर ताव मारत होता.
फिरंगी लोक इथे आल्यावर आपल्या प्रथा कौतुकाने जाणून घेतात, त्या आचरणात आणायचा प्रयत्न करतात ( याच इझरायली माणसाने आमच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी येताना संजाब ठेवून जानवं घालण्याचीही आपणहून तयारी दाखवली होती आणि सांस्कृतिक आदानप्रदान म्हणून ऑलिव्ह तेलात घालून मुरवलेल्या काकड्या मला खायला घातल्या होत्या त्या मात्र मला मुळीच आवडल्या नव्हत्या) आपण मात्र त्यांचं अनुकरण करताना अतिविशिष्ट असं काहीतरी केल्यासारखं दाखवतो हेही मला फारसं पटत नाही. ही दरी कधी सांधली जाईल?

--अदिती