आमच्या घरी मावशीकडे परदेशी विद्यार्थी, संशोधक येतजात असतात. घरातली एक खोली कायमची ह्या परदेश्यांना भाड्याने देण्यासाठी ठेवल्यासारखी आहे. सध्या ह्या खोलीत ब्रिटनचा ब्रँडन राहतो. ब्रँडन समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि भारतात सध्या पीएचडीच्या प्रबंधनासाठी संशोधन करण्यासाठी आलेला आहे. ह्या ब्रँडनला माझी मावशीने 'बंडू' हे नाव दिले. ते त्याला आता एवढे चिकटले आणि आवडले आहे तो बहुधा आता स्वतःचे नाव विसरून गेला असावा. जवळचे मित्र, सहकारी आता त्याला बंडू म्हणून बोलवतात. तो आम्हा सर्वांशी अतिशय प्रयत्नपूर्वक, हळूहळू पण कटाक्षाने मराठीत बोलतो. त्याची गोरी कातडी बघून कुणी फाडफाडपणे इंग्रजाळलेच तर त्यांना "मला इथली भाषा शिकायची म्हणून कृपया मराठीत बोला" अशी विनंतीही करतो.