जेव्हा अळूपासून अळवाचे असे रूप होते तेव्हा अळू पुल्लिंगी नसून नपुंसकलिंगी असतो. भुभू पुल्लिंगी म्हणून भुभूचे/भुभूंचे. अशीच रूपे चिंतू, बंडू, खडू, गेरू यांची होतात.

तनू, धेनू या संस्कृत स्त्रीलिंगी नामांची रूपे तनूचे, धनूचे अशीच होतात. अनेकवचनांतसुद्धा तनूंचे आणि धेनूंचे.

मराठी जळू-जाऊची रूपे जळूचे-जाऊचे अशी तर होतातच, शिवाय विकल्पाने जळवेचे-जावेचे अशीपण होतात. अनेकवचनी रूपे मात्र फक्त जळवांचे-जावांचे अशीच आहेत. त्यामुळे भुभू स्त्रीलिंगी असेल तर, एकवचनात भुभूचे आणि अनेकवचनात धेनूंचेप्रमाणे भुभूंचे किंवा विकल्पाने भुभवांचे.

भुभू नपुंसकलिंगी असेल तर वासराचे, लिंबाचे, पिलाचे, पाखराचे प्रमाणे भुभाचे/भुभांचे. किंवा कुंकवाचे आसवाचे/आसवांचे प्रमाणे भुभवाचे/भुभवांचे.

थोडक्यात, वैकल्पिक रूपे विचारात घेतली नाहीत तर, एकवचनात पुल्लिंगी-स्त्रीलिंगी भुभूचे आणि नपुंसकलिंगी भुभाचे.  अनेकवचनात पुल्लिंगी भुभूंचे, स्त्रीलिंगी भुभवांचे तर नपुंसकलिंगी भुभांचे अशीच रूपे होतील.