तेल, तूप खावे की नाही, खाल्ल्यास किती, कुठले, कसे, केंव्हा खावे याबाबत जनसामान्यांना बुचकळ्यात पाडण्याचे काम वैद्य मंडळी आणि ही उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या चोखपणे करत असतात. (मधुमेही लोकांनी रोज किमान काही चमचे साखर खाल्लीच पाहिजे असे बालाजी तांबे ठासून सांगतातच की! ) वैद्यकीय कारणांसाठी आणि वयपरत्वे सावध रहायचे म्हणून असे काहीसे बंधनात राहणे योग्य आहेच, पण हिवाळ्यातल्या रात्री दिल्लीतल्या रस्त्यांवर पायी फिरताना रस्त्यावरच्या ढाब्यावरचा गरम 'आलू पराठा' खाताना त्यावर घातलेले देसी घी ओरपताना कंजूषी करणे निव्वळ क्रूरपणाचे आहे. लोणावळ्यात अंतर्बाह्य भिजलेले असताना आणि टपरीवरच्या गरम मिरचीभजी आणि बटाटाभजी आपल्याला नावानिशी हाक मारून बोलावत असताना त्या भजी किती वेळा तापवलेल्या तेलात तळल्या आहेत याचा कारकुनी ताळेबंद जमवणे रानटी आहे. कोल्हापूरच्या चोरगेंची मिसळ खाताना पावाचा एक लुसलुशीत तुकडा त्या कैवल्यस्वरुपी रश्श्यात ('कटा'त! )  बुडवून तो तोंडात घातला की रंध्रारंध्रांतून सैलावत जाणाऱ्या सुखांच्या लहरी टाळून किती ओमेगा आणि कसले फॅटी ऍसिडस असले काहीतरी आठवणे हे पाशवी आहे. तापातून उठल्यानंतरच्या पहिल्या जेवणात वरणभातावर कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडस आठवून तूप नको असे म्हणणे असंस्कृतपणाचे आहे. 'कृष्ण चालले वैकुंठाला, राधा विनवित पकडून बाही, इथे तमाखू खाऊन घे रे, तिथे कन्हैय्या तमाखू नाही' हे ध्यानात ठेवलेले बरे. स्वर्गात कुठली आली आहे मिसळ आणि भजी! तेलातुपाचा दुस्वास करताना तेलतूप टाळून तरी नक्की काय प्राप्त होणार आहे, ते माहिती असावे. नाहीतर 'तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले' अशासारखे व्हायचे!