आपले विचार पटले.
जवळ पास सर्वच ठिकाणी मराठी भाषांतरे इतकी भयंकर केली जातात की ऐकवत नाहीत. अगदी साहित्यिक व शुद्ध (चिकित्सक वापरलेले) मराठी अपेक्षीत नाही पण कमीत कमी मराठी दुभाषा वापरून तरी भाषांतरे करवून घ्यावीत.
एकदा बोरिवली - मुंबईतल्या रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात दूरध्वनी लावला. मुद्रित आवाजात गुजराती - हिंदी व इंग्रजी हे पर्याय सुचवले होते. मुद्दाम गुजराती पर्याय निवडून मराठीत बोलायला सुरुवात केली व शेवटपर्यंत स्वतःचा हेका न सोडता स्पष्ट मराठीत जास्तीत जास्त शंका विचारत राहिलो शेवटी झक मारून त्या पोरीला एका मराठी जाणणाऱ्या माणसा मार्फत शंका निरसन करणे भाग पडले.
काही अपवाद सोडल्यास हल्लीच्या तरुण वर्गाचे मराठी इंग्रजाळलेले आहे. माझ्या स्वतःच्या घरात माझ्या धाकट्या मुलीचे मराठी इतके भयानक होते की एक पूर्ण वाक्य ती शुद्ध मराठीत व्यवस्थित बोलू शकत नव्हती. ती जेथे चुकेल तेथे दुरुस्त्या करून तेच वाक्य/ शब्द परत बोलून घेण्याच्या प्रयत्नाने आता जरा सुधारणा आहे. अर्थात बऱ्याच गोष्टी जन्मजात येत नसतात व त्यांची सवय / उजळणी करावी लागते. मी मनोगतावर आलो तेव्हा इतक्या अशुद्ध मराठीचा वापर करीत होतो की माझे जुने प्रतिसाद/लेख आज वाचल्यास माझी मलाच लाज वाटेल.
मी बऱ्याच वर्षांपासून (खास करून मनोगताची सवय जडल्यानंतर) मराठीचा येथेच्छ आग्रह धरतो. त्यामुळे बाकी काही नाही तरी मराठी माणूस तरी माझ्याशी संभाषण करताना मराठीतच सुरुवात करतो. जेथे बरेच इतर भाषिक लोक बसले असतात तेथे मराठी माणसाशी आग्रहाने मराठीत बोलून बघा...... काही दिवस लोकं तुमच्याकडे विचित्र नजरेने बघतील मग हळू हळू सवय झाल्यावर मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतील ! हे मी माझ्या स्वतःच्या गुजराती वस्तीत राहून केलेल्या प्रयोगाचे अनुभव सांगतोय.
माझ्या आईचा व मायबोलीचा मान सन्मान मीच ठेवला नाही तर इतर भाषिक का ठेवतील ?