मी ६ वी त असतानाची गोष्ट. सहामाही परीक्षा.. मराठी चा पेपर..
निबंधाचे विषय होते "माझा आवडता पक्षी" , "माझा आवडता सण" आणि "माझा आवडता नेता".
मला पहिले दोन्ही विषय लिहायला येत होते. त्यावयात काय, पाठ केलेलेच निबंध असायचे, स्वतःची अक्कल अशी कुठे होती?

शेजारी ७ वी ची एक मुलगी होती, आणि तिच्या पेपर मध्ये "दिवाळी" हा एक निबंधाचा विषय होता. आणि तिला कुठलाच येत न्हवता.
झालं... आमची "परोपकारी व्रुत्ती" उफाळून आली, आणि मी तिला मदत करायची ठरवली.

मी "माझा आवडता सण" म्हणून "दिवाळी" चाच निबंध तयार केला होता. मग तिला तो सांगायचा आणि मी "माझा आवडता पक्षी" लिहायचा असे ठरले.

तिला मस्त दिवाळी बद्दल सांगून झालं. आता स्वतःचा लिहायला लागले..माझा आवडता पक्षी होता "मोर"
२ परिच्छेद लिहून झाले आणि अचानक मला पाठ असलेल्या निबंधाहून काहीतरी नविन आणि वेगळ लिहावस वाटल..
आणि मी लिहिल "मोर ब्रम्हचारी असतो"..

आणि परत उरलेला निबंध पाठ केल्याप्रमाणे लिहिला व खुशीत घरी आले आणि आईला सांगितल की "बघ तू , बाई तुला फ़ोन करून माझ्या  निबंधाच कौतुक करतील "
रिझल्ट लागेपर्यंत सगळ आलबेल होत..

दिवाळी झाली आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मराठीचे पेपर वाटले, आणि सगळ्या वर्गात माझा निबंध वाचून दाखवला व म्हणाल्या, "बाळा,  असा मोर जर ब्रम्हचारी राहिला असता तर इतके मोर जगात तयार झाले असते का?" सगळा वर्ग जोरजोरात हसायला लागला, तेव्हा कुठे मला कळल की मी काय लिहून ठेवल होत ते. आणि मी महणल्याप्रमाणे बाई नी आईला खरच फ़ोन केला. पण अर्थातच कौतुक करण्यासाठी नाही तर माझ हे अशक्य लॉजिक घरी सांगण्यासाठी. त्यादिवशी मी घरी गेल्यावर सगळेजण माझ्याकडे  बघून बघून हसत होते..