आपला लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यावर आपण खूप मेहनत घेतली आहे हेही लक्षात येत आहे. अभिनंदन आणि आभार.

तसेच सीडीदेशमुख आणि कुसुमाग्रज यांचे अनुवाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. मला ही माहिती नवीन आहे.

आता माझे व्यक्तिगत मत. आपण म्हटले आहे.

पद्यानुवाद कशाकरता आस्वाद्य असू शकतात?

एक यादीच करू या!
१. इतर भाषेतल्या पद्याचे आकलन होण्याचा आनंद. म्हणजे अर्थानुवादातील आनंद.
२. त्या मूळ पद्यातील भाव-भावनांशी सहानुभूत होण्यातला आनंद. म्हणजे भावानुवादातील आनंद.
३. त्या मूळ भाषेतल्या शब्दांच्या पदलालित्याच्या व शब्दरचनेच्या आस्वादातील आनंद.
४. त्या मूळ पद्यातील नाद, लय, सूर, ताल इत्यादी. म्हणजे सांगितिक आकलनातील आनंद.
५. त्या मूळ पद्यातील गेयता अनुवादाच्या भाषेत आणता आली तर तो अनुवाद गाण्यातील आनंद.

वरील ५ कारणांपैकी कोणते जास्त महत्त्वाचे वाटणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. कोणतेही लेखन -गद्य वा पद्य- वाचल्यावर माझ्यासारख्या साहित्याच्या क्षेत्रातील 'ले वूमन' च्या प्रतिक्रिया 'छान लिहिलंय हं', किंवा 'ठीक आहे.' किंवा 'छे, नाही बुवा आवडलं.'  अशा प्रकारच्याच असतात.  म्हणजे माझी भूमिका केवळ आस्वादकाची असते, परीक्षकाची नसते. त्यामुळे मी निरनिराळ्या निकषांवर ते साहित्य घासून बघण्याच्या भानगडीत पडत  नाही. आनंद मिळतो की नाही एवढेच मी पाहाते, तो त्यातील कोणत्या गुणांमुळे मिळाला ह्याच्याशी मला फारसे कर्तव्य नसते. कधी कधी अनुवाद वाचून मूळ गाणे ओळखता आले इथेच माझ्या आनंदाची सुरुवात आणि शेवटही होतो. 

 असो. लेख अभ्यासपूर्ण आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे. वरील काही प्रतिसादांनुसार वाचकांना त्याचा उपयोग होईलच. मनोगतावर अनुवाद अधिकाधिक  लोकप्रिय होतील. (आताच तशी लक्षणे दिसू लागली आहेत.) तेव्हा ह्या उपक्रमासाठी आपण आणि इतर अनुवादकर्त्यांना माझ्या सर्व शुभेच्छा.