१) क्षमा करा, पण तारेमुळे व इजेक्ट बटनच्या कसरतीने सीडी ड्राइव्ह निकामी होऊ शकतो. पुनर्वापर करण्याची अशी रीत वस्तुच्या टिकाऊपणा व उपयुक्तपणावरच घाला घालते. पर्यावरणाचं संरक्षण कसं होईल जर ही निकामी वस्तू टाकून देऊन नवी घेतली तर?

तुम्हाला ह्या बाबतीत क्षमाच करायला हवी. कारण गेले ५ वर्षे मी तो सीडी ड्राईव्ह वापरत आहे आणि माझी एकही सीडी आत्तापर्यंत खराब झालेली नाही. ह्याचे कारण ही कसरत करताना त्या तारेच आणि सीडी वाचकाचा (CD Reader) काहीही संबध येत नाही.

पर्यावरण संरक्षणाचे म्हणाल तर भारत ई-कचरा (अयोग्य प्रकारे) विल्हेवाटीचे दुवा क्र. १  जागतिक केंद्र बनला आहे असे माझे नव्हे पर्यावरण तज्ज्ञांचे मत दुवा क्र. २ आहे. बारक्या सारक्या सोप्या दुरुस्त्या न करता वस्तू फेकून देणे केवळ चैनीची गोष्ट आहे असे मी मानते.  

२) तसंच दूघ साठवण्याच्या शीतयंत्रातील पाण्यात माती घालायची म्हणजे पाणी दुषित करणे... मातीतून अगणित जंतू पाण्यात सोडायचे वर त्यात दुधाचे कॅन ठेवायचे. पाण्याच्या संपर्काने मातीतून जंतुंची अनिर्बंध वाढ होईल त्याचे काय? ते जंतू कॅनच्या बाहेरील आवरणावरून दुधात जाणार नाहीत याची काय गॅरंटी आहे... शिवाय कॅनमधील दूध बाहेर काढताना कॅनवरच्या पाण्याचे जंतुमिश्रित थेंब दुधात मिसळण्याचा देखिल संभव आहे. आरोग्याशी संबंध आहे तिथे स्वच्छता अतिशय काटेकोरपणे सांभाळली गेली पाहिजे.

आपला हा जर निकष खरा मानायचा तर भारतात प्रत्येक दुधाचा थेंब पिण्यापूर्वी ते दुध ज्या शेतकऱ्याने काढले होते त्याने दुध काढण्यापूर्वी हात धुतले होते की नाही ह्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक ठरेल. कारण खुद्द अमूल, गोकुळ आणि महानंदा सारख्या सहकारी दुग्धशाळा आजही हाताने दुध दोहणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुध घेतात.

अजूनही गाईच्या आचळाला यंत्रे लावून दुध दोहन करण्याची पद्धत भारतात आलेली नाही.

दुसरे म्हणजे ह्या दुधाच्या कॅनचे तोंड शीतयंत्रात पाण्याच्या पातळीच्या वर कमीत कमी दीड वीत असते तसेच ते दुध पाश्चराईज्ड करूनच लोकांपर्यंत पोहोचवले जाते.

निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतात मोठ्या संयंत्रांत बनविल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची हमी पण कोणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल आणि मंडईत मिळणाऱ्या भाज्यांबद्दल तर बोलायलाच नको.

असे असेल तर भारतात आपण अन्न पाण्याचा त्याग करणार का?

ह्यावरून सहज आठवले, मी ३५७ क्रमांकाच्या बसने देवनार बस आगाराकडे जात होते. कत्तलखान्यावरून जाताना आतली दृश्य पाहून किळस आली. त्यावर बसवाहक म्हणाला की अस्वच्छता पाहून अंग शहारत असेल तर तुम्ही साखर कशी खाणार? साखरेचा आणि प्राण्यांच्या मृतदेह यांचा संबंध काय हे मला ठावूक नाही आणि ते जाणून घ्यायची पण इच्छा नाही. पण आजही साखर घेण्यासाठी डबा उघडला की ते शब्द माझ्या कानांत घुमतात.

अशा युक्त्या पर्यावरणाचे संरक्षणच काय पण पैशाची बचत करू शकतील असं मलातरी वाटत नाही... चूक भूल द्यावी घ्यावी!

(व्यक्तिगत वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)