पण तरीही फोल्डर हा शब्द वापरून इतका गुळगुळीत झाला आहे की मराठीतही 'फाइल'प्रमाणे 'फोल्डर' तसाच वापरावा काय? याबाबत आपली मते कृपया कळवावीत.
माझे वैयक्तिक मत - वापरू नये. वर अस्तित्वात असलेले व सोपे असे अनेक मराठी प्रतिशब्द सुचवले गेले आहेत त्यातील एखादा वापरावा.
अशा चर्चांमध्ये दुर्दैवाने दोन्ही बाजूंनी सहसा आत्यंतिक टोकाची मते मांडली जातात. एका बाजूस, कोणताही परभाषिक शब्द जरासा मराठी भाषकांच्या वापरात येऊ लागला तर त्याला ताबडतोब शुचिर्भूत करून घेऊन मराठीत मानाचे स्थान द्यावे हे आग्रही मत तर दुसरीकडे, परकीय भाषेतील शब्द कदापि मराठीत स्वीकारू नये हा अट्टहास. पहिल्या मताच्या पुष्ट्यर्थ भाषेचा प्रवाहीपणा, व भाषा-भाषांमधील देवाण-घेवाण अपरिहार्य असणे हे मुद्दे हिरीरीने मांडले जातात. मात्र ते मांडताना अशी देवाण-घेवाण ही संथपणे, नैसर्गिक गतीने व्हावी; ती स्वतःच्या भाषेविषयीच्या अज्ञानामुळे, तिच्या लखलखत्या शब्दसंपदेकडे दुर्लक्ष करून, व मुख्य म्हणजे लेखकाच्या वैचारिक आळसापोटी व दिवाळखोरीपायी केलेली उधार-उसनवारी नसावी असे मला वाटते. एखाद्या परभाषिक शब्दासाठी मराठीत जर प्रतिशब्द उपलब्ध असेल तर तो वापरावा. अधिकाधिक लोकांनी तो वापरल्यास तो आपोआप रूढ होईल, तोंडावर रुळेल. प्रतिशब्द अस्तित्वात नसल्यास एखादा सोपा, सुटसुटीत प्रतिशब्द बनवावा. तो मूळचा अर्थवाही असलाच पाहिजे, संस्कृतोद्भव (किंवा आणखी कोणताही 'उद्भव') असलाच पाहिजे असे नाही. प्रथमदर्शनी तो साफ निरर्थक असला तरी चालेल. कारण 'लोहपथमार्गगामी' सारखे हास्यास्पद मालगाडीसदृश शब्द बनवण्या व वापरण्याच्या दुराग्रहामुळे, हट्टामुळेच प्रतिशब्दांकडे, प्रतिशब्दनिर्मितीकडे सामान्य माणसे पाठ फिरवतात.