अभिजित, लेखन आवडले. पुलेशु.

छायागीत बघाऐकायला मलाही आवडायचे आणि एका गाण्याची मी नेहमीच वाट बघायचे पण ते अगदीच क्वचित लागायचे. लागले की मग मात्र अगदी तल्लीन होऊन जायचे मी त्या भावना  ऐकून ते नृत्य बघण्यात. कित्तीदा प्रयत्न केला की ते लिहून घ्यावे म्हणजे म्हणता येईल पण प्रत्येकवेळी ऐकण्यातच गुंगून गेल्याने ते कधी जमलेच नाही. आक्काला या कामाला लावले होते शेवटी ! ते गाणे होते - बोल री कठपुतली डोरी कौन संग बांधू सच बतला तू नाचे किसके लिये? आजही हे एकुलते एक गाणे असे आहे की जे ऐकले की एका वेगळ्याच आयामात जाऊन काहितरी अमोघ अनुभवल्याचा आनंद मिळतो मला. या गाण्यावर नाचून दाखवून मी अस्मिताकडून भरतनाट्यमच्या १-२ स्टेप्स शिकले होते शाळेत.. अर्थात नंतर त्यावर घरातून बंदी आली होती माझ्या हे निराळे.. पण ते दिवसच धुंद होते हे मात्र खरे. आता हे गाणे कुठेच ऐकायलाही मिळत नाही हा भाग वेगळा. असो.

गुरू गोविंदसिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या ऍडमिशनसाठी माझे नाव येते की नाही, कोणते कॉलेज मिळते वगैरे बघण्यासाठी मी आणि बाबा सकाळपासून तिथल्या एका मोठ्या हॉलमध्ये बसलो होतो. खरेतर मी प्रचंड ताणात असायला हवे होते कारण निवडप्रक्रिया जरी २-३ दिवस चालणार होती तरी माझ्या नावाबद्दलचा निर्णय त्याच दिवशी होणे आवश्यक होते कारण रहायला जागाच मिळाली नव्हती तिथे कुठल्याच हॉटेलमध्ये इतकी तूफान गर्दी होती. मला मात्र या कशाचीच तमा नव्हती.. मी गुंगून गेले होते कॉलेजने लावलेली एक-से-एक सुमधूर आणि रोमँटीक मराठी गाणी ऐकण्यात. अख्खा दिवस कसा भुर्रकन् उडून गेला पत्ताच लागला नाही.. ना भूक लागली ना तहान.. ना भविष्याची चिंता वाटली.. ना शेजारी बसलेले बाबा काय म्हणत असतील याची फिकीर ! दिवसाचा कारभार आटोपायची वेळ झाली होती बहुदा आणि बाबा एकदम हर्षोत्फुल्ल आवाजात म्हणाले, "बुदुकल्या, तुझे नाव पुकारलेय बघ ! जा बघून ये कोणते कॉलेज आहे ते.. " आणि मी तेव्हा लागलेले सखी मंद झाल्या तारका.. गाणे गुणगुणत माझे भवितव्य काय आहे ते बघायला गेले !!!

ऑफिसमध्ये सर्वजण जेवायला गेलेले पाहून मी माझ्या मोबाईलवर आवडते गाणे लावून कानात इअरफोन्स घालून डोळे मिटून ऐकत होते. ऐकून संपले आणि डोळे उघडले तर माझ्याभोवती कित्येक जणांचा गराडा पाहून मी एकदम हडबडून गेले, नक्की काय झाले ते न कळून. मग कळले की माझ्या इअरफोन्सचे मोबाईलवरचे कनेक्षन लूज असल्याने धक धक करने लगा.. हे गाणे माझ्या अख्ख्या फ्लोअरला ऐकू गेले होते !!!

खूपच निवडक ट्रेक करू शकलेल्या माझ्या आयुष्यात जर कुलंगगडाचा ट्रेक संस्मरणीय ठरला असेल तर त्यात नवल ते काहीच नाही पण त्या ट्रेकमध्ये मी अर्ध्याच रस्त्यात एका सुगंधाने वेडावून जाऊन रस्ता चुकले होते. तो सुगंध एका रानटी फुलाचा होता. ते रोप सापडले आणि ते फुल दिसले तेव्हा मी ट्रेक, माझे बरेच पुढे निघून गेलेले सोबती, माझी सुरक्षा वगैरे सगळे विसरून.. तुला पाहते रे तुला पाहते.. जरी आंधळी मी तुला पाहते.. हे गाणे गुणगुणत त्या रोपापाशी बसून राहिले होते ! अर्ध्यापाऊण तासाने धनंजयसर, राजश्री वगैरे आले होते मला शोधत आणि यू आर जस्ट मॅडेस्ट गर्ल, वेदा असे म्हणून हेऽऽ भलेमोठे लेक्चर देऊन त्यांनी नीट रस्त्यावर आणले होते.

अशा अगदी शेकडोंनी आहेत आठवणी एकेका गाण्याशी निगडीत.

आजकालच्या गाण्यांमध्ये सद्ध्या माझे आवडते जर कुठले असेल तर..

दिल.. कभी ठंडा कभी है ऍटमबंबसा.. दिलका भरोसा.. कैसे कोई कहे
दिलकी यही खता है.. दिलको नहीं पता है.. दिल चाहता है क्या?

हे आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र उगाचच पिया बसंती रे.. काहे सताए आजा हेच मोहक गाणे माझ्याकडून गुणगुणले जात आहे.