हे दोन्हीही तिसऱ्या गणाचे धातू असून त्यांचा अर्थ जवळपास सारखाच म्हणजे देणे आहे असे वाटते. दा - यच्छ या चौथ्या गणाच्या धातूचाही अर्थ देणे असाच आहे. आम्हाला पुढील श्लोक शिकवला होता त्यात धा या धातूचा देणे हा अर्थ स्पष्ट होतो असे वाटते.
कल्याणानां त्वमसि महसां भाजनं विश्वमूर्ते,
धुर्यां लक्ष्मीमथ मयी भृशं धेही देव प्रसीद,
यद्यत्पापं प्रतिजहि जगन्नाथ नम्रस्य तन्मे,
भद्रं भद्रं वितर भगवन् भूयसे मंगलाय॥
(अर्थ, हे विश्वमूर्ती देवा, तू कल्याणाचे मोठेच भांडार (चूभूदेघे) आहेस. हे देवा, (माझ्यावर) प्रसन्न होऊन तू मला खूप संपत्ती दे (धेहि) , हे जगन्नाथा, तुझ्यापुढे नतमस्तक असलेल्या माझे जे जे पाप असेल ते (प्रत्येक पाप)नष्ट कर आणि जे जे सगळं चांगलं, उत्तम कल्याणप्रद असेल ते सगळं मला खूप प्रमाणात दे)
(या श्लोकाच्या शुद्धएखनात काही चुका राहिल्या असतील तर त्या कृपया सांगाव्यात ही विनंती)
असं असेल तर बहुदा आणि बहुधा हे सारख्याच अर्थाचे आणि पाठभेद म्हणता येतील असे शब्द व्हायला हवेत.
मला बहुदा म्हणजे खूपदा, पुषकळदा (दा संख्यावाचक उदा. एकदा, दोनदा, कितीदा इ. ) वाटतो. वरदा, महेशराव, मीराताई, शु.म. असे तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकतीलच अशी खात्री वाटते.
बाकी अधिक बुद्ध्यांक असलेली लोकं खूप हुशार असतात असा माझा समज आहे. मेन्सा वगरे संस्थांमध्ये विशिष्ट बुद्ध्यांकांच्या पुढील संख्येइतका बुद्ध्यांक असलेल्या लोकांना प्रवेश मिळतो असे ऐकले आहे. बुद्ध्यांकाचा संबंध आकलनशक्तीशी असतो, डेटा प्रोसेसिंगशी असतो, गणिती आकडेमोडी करण्याशी असतो, नवनिर्मितीशी असतो, कल्पनाशक्तीशी आणि भौमितिक आकृत्यांशी असतो की तार्किक अंदाज बांधण्याशी असतो हे मात्र मला कळलेले नाही. शुमंनी वर दिलेला तक्ता असे असायला हवे अशा स्वरूपाचा असला तर त्याचा अर्थ बहुतेक "या वयोगटातल्या बऱ्यापैकी प्राविण्य मिळवलेल्या लोकांचा बुद्ध्यांक या रेंजमधे असतो" अशा संख्याशास्त्रीय विधानासारखा असावा. पण याचा अर्थ असा घ्यायचा का की किमान पदव्युत्तर शिक्षणा पूर्ण केलेल्या माणसांचा बुद्ध्यांक अमुक एका संख्येच्या आगेमागे असायला हवा?
शिवाय प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळी प्राविण्यपातळी गाठून असतो. उदा. काही लोक गणितात अतिशय हुशार असतात आणि भाषा किंवा जीवशास्त्र वगैरे विषयात त्या मानाने कमी हुशारी दाखवतात. अशा लोकांचा बुद्ध्यांक भाषा किंवा जीवशास्त्रात तितकेच प्राविण्य दाखवणाऱ्या माणसांच्या बुद्ध्यांकाएवढाच असेल की त्यात काही फरक पडेल?
साधारण शैक्षणिक पातळी विचारात न घेता शारीरिक वय विचारात घेतले असता अशाच स्वरूपाचा तक्ता देता येऊ शकेल काय?
वरील तक्ता कोठून उपलब्ध झाला आणि त्याच्या विश्वासार्हतेविषयी काही सांगता येईल काय?
--अदिती