मला असे वाटते की इंग्रजीमधे संगणक आणि गणितातील परिभाषा ही कुठुन तरी उसनवार करुन बनवलेली आहे. गणितातील फिल्ड, रिंग, ग्रुप, फंक्शन, सेट वगैरे शब्द सामान्य भाषेत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात पण गणितात तेच शब्द जास्त कठोर व्याख्या करून वेगळ्या अर्थाने वापरले जातात. तसेच संगणक क्षेत्रातील बस, स्विच, राऊटर, असेंम्बल, कंपाईल वगैरे शब्द कुठून तरी उचलले आहेत. तसे मराठीत नक्कीच करता येईल.
  पण ह्यावर लोकांचे एकमत कसे होणार? अशी कुठली अधिकारी संस्था वा व्यक्ती मला माहित नाही की जी ह्या बाबतीत अंतिम निर्णय घेईल आणि बाकी लोक ते मानतील. (मराठी लोकांमधे तर अशा बाबतीत एकमत होणे आणखी अवघड!) पूर्वी मराठी शाळेची पाठ्यपुस्तके अशा स्टँडर्डाईझेशनला (कृपया मराठी शब्द सांगा) मदत करत. संगणक विषयात तसे होणे अवघड वाटते आहे.
आता निश ला खोबण म्हणायचे का वळचण का कोंदण यावर वाद घालता येईल. पण कधीतरी एकमत होऊन तो मराठी शब्द वापरात येणे जास्त महत्त्वाचे आहे. ह्या क्षेत्रात कुठली संस्था वा तज्ञ व्यक्ती काम करत आहे का? इंग्रजीमधे अशी परिभाषा कशी रूढ केली गेली? कुणाला माहित आहे का?