अमेरिकेविषयी फारशी माहिती नसताना भाबडेपणाने अमेरिका थोर आहे असे घाऊक मत असलेल्या लोकांना  कितीही आणि कसलीही माहिती दिली तरी काही फरक पडेल असे वाटत नाही. केशर, चॉकलेटस, डीओ आणि खारवलेले पिस्ते यातूनच अमेरिका बघणाऱ्यांसाठी काही करू नये, हेच उत्तम. 'भारतीय लोकांनी खादाडपणा सोडावा तरच जगाची अन्नसमस्या दूर होईल', 'भारतीय शेतकऱ्यांनी भात उत्पादन घेणे थांबवावे, कारण भारतीय भातशेतीतून कैक कोटी टन मिथेन वातावरणात मिसळतो आहे' अशा अमेरिकेच्या दैदिप्यमान मतांवर माना डोलावणाऱ्यांना काय आणि कसे सांगणार? आणि ही वाढत जाणारी संख्या बहुमतात गेली तर नवल वाटू नये. संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे बहुमत हे नेहमी अतिसामान्यांचेच असते. दी मीक शॅल इन्हेरिट दी अर्थ असे ख्राईस्ट म्हणाला ते उगीच म्हणून नव्हे.