-

राज्यकर्त्यांना आपल्या शासकीय यंत्रणेकडून राज्यकारभार करवून घेता येत नाही ही समस्या आहे. इतर भाषिकांचा द्वेष करण्याने मराठी भाषेचं व मराठी समाजाचं भलं होणार ही विचारसरणी चुकीची आहे. शासकीय यंत्रणेवर कशी जरब बसवायची, त्यांना प्रोत्साहन कसे द्यायचे हे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना शिकायची वेळ आली आहे.

अहो राज्य मराठी माणसाचे, (बहुतांशी) अधिकारी- कर्मचारी वर्गात मराठी माणसेच, कायदा मराठी माणसांनीच पारित केलेला मग 'मराठी भाषा वा समाज' धोक्यात येतोच कसा? मराठी समाज आप-आपसात केवढा दुभंगला आहे. जाती पासून आर्थिक स्तरावर, भौगोलिकतेतील अंतरा पासून ते शैक्षणिक अंतरापर्यंत. ही अंतरे मिटायला हवीत. शहरातली मंडळी नोकरीचे आठ तास उरकले की घरी येऊन टी. व्ही. समोर तोंड उघडं टाकत कार्यक्रम पाहत बसणं यातच सुख शोधत आहे.  हे सर्व बदलण्यासाठी प्रयत्न केला जायला हवा.

ज्यांच्या कृतीला तुमचं समर्थन आहे त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर दोष घुशींचा नाही भुसभुशीत झालेल्या जमिनीचा आहे. पण नाही, आपल्याला हवं सगळं 'इंस्टंट', 'झट्-की-पट'.

(फार पूर्वीच्या काळी आर्यांची एक टोळी उत्तर भारतात आली व स्थिरावली होती. पण त्यानंतर आर्यांची जी दुसरी टोळी भारतात आली तिने ह्या आधीच्या मंडळींना हुसकून लावले होते. ही जी हुसकावण्याला आलेली मंडळी दक्षिणेत येऊन स्थिरावली होती. आज त्यांना महाराष्ट्रीय म्हटले जाते. आता इतिहासाची पुनरावृत्ती होतेय की काय?)

द्वेष पसरवून आपण आपले महाराष्ट्राचेच नुकसान करून घेऊ. कारण, 'जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळते' हा सृष्टीचा नियम आहे.

महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना दुसऱ्यावर अंकुश ठेवायला आवडतो म्हणूनच त्यांच्यावर दिल्लीतून चलाख मंडळींकडून अंकुश ठेवला जातो. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यावर महाराष्ट्राचे हित ध्यानात घेऊन इथल्याच बुद्धिमंतांचा अंकुश ठेवायचा असेल तर त्यांना (राजकारण्यांना )शिक्षण, मार्गदर्शन, टीका इथूनच दिली/केली जायला हवी. इथल्या क्षत्रियांमध्ये अजूनही 'रग' बाकी आहे याचं कौतुक माधव कुलकर्णी यांना आहे. पण येथील 'ब्राह्मणांत' (राजकारण्यांवर अंकुश ठेवण्या इतपत) तेज उरलेलं नाही याचं दुःख का वाटत नाही?

'शूद्रांच्या - सामान्यांच्या' भल्यासाठी, वैश्यांना क्षत्रियांचा जसा धाक वाटायला हवा (कायदा व शासकीय यंत्रणेतूनच) तसाच क्षत्रियांवर ब्राह्मणांचा-बुद्धिमंतांचा (शिक्षण, मार्गदर्शन, बंद दरवाज्यातील टीका यांमधूनच) अंकुश हा असायलाच हवा.