रस्त्यावर फुकटचे पार्किंग हा हक्क नाही ही मानसिकता फार कमी लोकांची असते. अशा मोठ्या व्यवसायांना परवानगी देण्याआधी गाड्या लावण्याची सोय काय आहे हे महापालिकेने बघितले पाहिजे. व्यायामशाळा ही तशी फार छोटी गोष्ट आहे. बिग बाजार, किंवा रिलायन्स फ्रेश सारख्या गर्दीगोंधळया ठिकाणांनीही पुरेशी सोय केलेली नसल्याने 'रस्ता आपलाच बापाचा' आणि स्वतःचे आडनाव कर्वे, फर्गसन किंवा जंगली महाराज असे असल्याच्या थाटात रस्त्यावरच गाड्या लावल्या जातात. कायद्यात पळवाट शोधणारे काही महाभाग युक्ती म्हणून एकाने आत जाऊन वस्तू खरेदी करायची आणि दुसऱ्याने एसी लावून रस्त्यावरच गाडीत थंड  पडून राहायचे असे करतात. हे चुकीचे आहे. रस्ता आधी वाहतुकीसाठी आहे आणि शक्य असेल तर गाड्या लावण्यासाठी  हे मनावर ठसणे आवश्यक आहे.