मनोगतावरची वैशिष्ट्यपूर्ण शब्दकोडी आता सोडवणाऱ्यांना सरावाने बरीच सोपी जातात, कारण शोधसूत्रांविषयीचा "लातूर पॅटर्न" आता बहुतेकांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे ह्यावेळी शोधसूत्रे देताना थेट संबंध न जोडता थोडा आडवळणाने जोडला हे मला मान्य आहे, मात्र तो बादरायण नक्कीच नव्हता. काही शब्दांचा नव्याने विचार करता काही आक्षेप मान्यही करायलाच हवेत. शोधसूत्रांचे स्पष्टिकरण + आक्षेपांचे खंडन +आक्षेपांस मान्यता खालीलप्रमाणे -

आडवे शब्द -
१. सूर्य बुडताच जोरात संसर्ग झाला. (५) - दिवेलागण
सूर्य बुडताच अंधार होतो आणि तेव्हा सर्वप्रथम काय करण्याची वेळ येते तर दिवे लावण्याची. लागण = संसर्ग.

११. योगायोगाने एकाच माळेचे सोन्याने मढले. (५) - मणीकांचन
मणीकांचन योग, म्हणून योगायोगाने, एका माळेचे मणी हा वाक्प्रचार प्रचलित आहे म्हणून त्याचा वापर. कांचन = सोने म्हणून सोन्याने मढले.

२२. संपाचा मारा नि रागाचा पारा. (३) - संताप
संतापातील पहिले व शेवटचे अक्षर मिळून संप, पाऱ्याचा संबंध आपण तापाशी लावतो (तापमापी), संताप = राग.

३१. बोरीला हाण । कपडे आण  ॥
    भांड्यांचे वाण । ठाण ठाण ठाण ॥ (४) - बोहारीण 
बोहारीण ही बाई जुन्या कपड्यांवर भांडी देते म्हणून जुळवलेल्या दोन ओळी. बोहारीण मधील पहिले आणि तिसरे अक्षर मिळून बोरी आणि दुसरे व शेवटचे अक्षर मिळून हाण. हे शोधसूत्र समजण्यासाठी शेरलॉक होम्सच हवा असेल तर अनेक होम्स मनोगतावर आहेतसे दिसते :)

४१. मग गुंतलात तरी पद्धत पाळून हुशार व्हाल (५) - तरतरीत
तर साठी मग, रत साठी गुंतलात, तरी साठी तरी, रीत साठी पद्धत आणि तरतरीत साठी हुशार.

उभे शब्द
१. राक्षसांच्या आईला बुद्धी होऊन तिने चांगली बडदास्त ठेवली (३) - दिमती
राक्षसांच्या आईचे नाव दिती. मती = बुद्धी, दिमतीला ठेवणे साठी बडदास्त. गाड्याघोडे दिमतीला असणे, दिमतीला नोकरचाकर असणे अशाप्रकारे दिमतीला हा शब्द वापरला जातो. मूळ शब्द दिमती असेल असे मी गृहीत धरले. ईकारान्त स्त्रीलिंगी नामाला चतुर्थीचा प्रत्यय लागतो तेव्हा मूळ शब्दाला पुढे ला जोडले जाते. जसे, चटणी - चटणीला, भाजणी - भाजणीला, बोचणी - बोचणीला, माती - मातीला, वगैरे. त्यामुळे दिमतीला वरून मूळ शब्द दिमती असावा असे मला वाटले. मीरा फाटकांच्या मतानुसार मूळ शब्द दिम्मत असावा. तसे असल्यास माझी चूक मान्य. ह्या शब्दावर आणखी चर्चा झाल्यास उत्तम.

२. "आई गऽ! वैतागले ह्या केसांना!! "
    "अगं, भट्टनारायणाचं पाहून त्यांना मारून का टाकत नाहीस?" (५) - वेणीसंहार
हे शोधसूत्र सोपे होते. महाभृंगराज तेलाच्या काही वर्षांपूर्वी येणाऱ्या जाहिरातीतील संवादाचा वापर केला आहे. वेणीसंहार नाटकाचा कर्ता भट्टनारायण म्हणून त्याचे नाव महाभृंगराज ऐवजी वापरले.

१३. काळे मणी पवित्र? दारा भार्या कलत्र ॥ (२) - कांता
ह्या शब्दावरचा अदितीचा आक्षेप मान्य आहे. कांता म्हणाजे स्त्री. कांता ही पत्नी असेलच असे नाही. मात्र मी कांताचा पत्नी असा अर्थ घेऊन शोधसूत्र तयार केल्याने शोधसूत्राचा शब्दाशी संबंध लागत नाही हा आक्षेप मान्य आहे.

१५. वनात रोज करतो चोरी । ओशट तोंड पांढरे करी (४) - नवनीत
नवनीत म्हणजे लोणी. लोणी खाणाऱ्याचे तोंड ओशट आणि पांढरे करते. नवनीत मध्ये वन आहे आणि लोण्याचा संबंध कृष्णाच्या चोरीशी अनेकदा लागतो.

 २४. जळण आणताना पाऊस पडून गेला तर मनाचा निश्चय होतो. (२) - पण
जळण = सरपण, त्यातून पावराची सर पडून गेली की सरपण - सर = पण, म्हणजेच मनाचा निश्चय. पण करणे म्हणजे मनाने एखादी  गोष्ट करण्याचे वा न करण्याचे पक्के ठरवणे.

३३. "म्हणून मी उलट सांगत होते. वागण्याची काही पद्धत असते की नाही? " (२) - रीत
रीत = पद्धत, रीतच्या उलट तरी म्हणून शोधसूत्राचा पहिला भाग म्हणून मी उलट सांगत होते.