टेबल, पेन इत्यादी शब्दांप्रमाणेच बॉक्स ह्या शब्दाने अनेक वर्षांपूर्वीच मराठी संभाषणात स्थान मिळवले आहे. बॉक्स म्हणजे पेटी हे जरी बरोबर असले तरी बोली मराठीत हा शब्द पुल्लिंगीच वापरला जातो. "तो बॉक्स उचल", "मी बॉक्स भरला", "हा बॉक्स खूप जड आहे" अशा प्रकारेच त्याचा वापर केला जातो. हे बरोबर की चूक ह्यावर आता कितीही काथ्याकूट केली तरी त्याचा काही उपयोग होईलसे वाटत नाही. बॉक्सला मराठी भाषकांनी पुल्लिंगी ठरवल्यामुळे साहजिकपणे लोकांच्या तोंडी 'ती मेलबॉक्स' पेक्षा 'तो मेलबॉक्स' हेच रुळले. आता 'ती मेलबॉक्स' चा हट्ट धरणे अतिरेकी पांडित्यदर्शन (पेडॅंट्री) ठरेल. दुसरा मुद्दा असा की पेटी हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून बॉक्स हा समानार्थी शब्द मराठीत आणल्यावर तोही स्त्रीलिंगी असलाच पाहिजे असा काही नियम नाही. 'पैरण' स्त्रीलिंगी आहे पण त्याच्याऐवजी आयात केलेला व आता सार्वत्रिक झालेला 'शर्ट' पुल्लिंगी आहे.
ऍडमिशनचा अर्थ परवानगी नसून कोणत्याही ठिकाणी प्रवेश किंवा प्रवेशाची प्रक्रिया - "धी प्रोसेस ऑर फॅक्ट ऑफ बिईंग ऍडमिटेत टू अ प्लेस".
ओव्हर म्हणजे एका गोलंदाजाने सलग आणि नियमानुसार टाकलेल्या सहा चेंडुंचा गट; चेंडू टाकायची पाळी नाही. "चेंडू टाकायची पाळी" म्हणजे 'हिज् टर्न टू बोल'.
एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत आणताना वापरण्याचे कोणतेही संहिताबद्ध नियम नाहीत. त्यामुळे जे रूढ होते ते स्वीकारून त्यास मान्यता देणे इतकेच आपण करू शकतो.