लहान मुलं हेच कुठल्याही समाजाचे भविष्य असते. जे वातावरण प्रौढ जनता आपल्या वागण्या-बोलण्या-आचरण्याने ह्या लहान मुलांना उपलब्ध करून देतात ते वातावरणच त्या मुलांवर संस्कार करविते, त्यांना घडविते. ह्या संस्कार होण्याच्या प्रक्रियेतूनच 'संस्कृती' आकार घेत जाते. जसं जेवणात 'फोडणीला' महत्त्व असते तसंच जीवनात 'संस्कारांना' महत्त्व असते.

आपण ज्या चुका, सवयी नकळत करीत आहोत त्या चुकांना पाठीशी घालण्यासाठी आपण असे जे म्हणत आहात ते नक्कीच चुकीचे आहे. आपण म्हणता, 'असे झाले तर भाषा फारच एकसुरी आणि नीरस होईल असे वाटते. शब्दश्लेष, अर्थश्लेष वापरता येणार नाहीत. ' खरतरं, आपण चुकताय, आपले म्हणणे स्वीकारले तर मराठी भाषा प्रगत भाषा न होता आदिवासींच्या भाषेसारखीच होईल. चुका सुधारण्यातूनच, टाळण्यातूनच समाज प्रगत होतो.

भाषा जर कमीत कमी शब्दातच चालवायची असेल तर मग बोलायचं कसं?  दुसऱ्याने समजून तरी कसं घ्यायचं?   भावी पिढी ला मराठीतूनच गणीत, भूमिती व इतर वैज्ञानिक विषय शिकवायचे असतील तर नेमका व थेट अर्थ सांगणाराच शब्द  (शिक्षकांकडून, समाजाकडून) वापरायला जायला हवा. आता मी जे हे वर लिहिले आहे त्यात बरेच ठिकाणी एकच शब्द अनेक ठिकाणी वापरला तर तुम्हाला कळेल का मला काय म्हणायचे आहे ते? तादा तीदी ती दी तादा तीदी तादा ता दा ती दी ताता दी दीता, समजलं कां?

भावी पिढी कडून विचारांचे इमले एकावर एक उभे करता येण्यासाठी,  विचारांचा डोलारा उभारण्यासाठी योग्य शब्दरूपी वीटच वापरली जायला हवी.   छत्रपतींच्या काळात 'जितके गड, ठाणी जास्त, तेवढे मोठं साम्राज्य' असं लॉजिक होतं.   त्या लॉजिकवरच शिवबा - छत्रपती शिवाजी महाराज झाले, हिंदवी साम्राज्य उभे झाले.   सध्याच्या काळात 'जेवढे शब्दभांडार मोठं, तेवढं विचारांचं साम्राज्य मोठं' हे लॉजिक आहे.   अशा विचारांच्या साम्राज्यातूनच एखादा समाज सुखी-समृद्ध होवू शकतो.

- सतीश रावले