नमस्कार.
खास मैत्रिण, तुमचा आभारी आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की मी माझ्या नेहमीच्या गोतावळ्यात ही ईमेल पाठवली होती. सकाळकडे लेख प्रसिद्धीसाठी म्हणून दिलेला नव्हता. आपोआप आला! आता कसा आला ते पाहिलं पाहिजे. पण आला हे चांगलंच झालं ... !
आत्ताच एक कल्पना सुचली. माझा असा ग्रह आहे की भारतात 'TRAI' कडून दूरध्वनीसंबंधित काही चांगल्या नि ग्राहकांचा विचार करणाऱ्या नियमावली बनवल्या जातात नि त्या प्रत्यक्षात आणल्याही जातात. त्यांमुळे उद्दाम नि नफ़ेखोर मोबाईल सेवादात्यांवर बऱ्यापैकी नियंत्रण आहे. कुठल्याही मोबाईल कंपनीच्या हस्तध्वनी उपकरणाच्या सगळ्या मॉडेल्सवर देवनागरी व राज्यनिहाय इतर भाषा यांचे लेखन / सहाय्य अनिवार्य केले जावे अशा आशयाचा नियम 'ट्राय' तर्फे अस्तित्वात आणला जाऊ शकतो का नि त्यासाठी काही स्वरूपाचा उपक्रम आपण करू शकतो का? उदा. 'ट्राय'ला काही हजार सह्यांचे निवेदन पाठवणे / काही हजार ईमेल पाठवणे इ.
कृष्णकुमार, माधव कुलकर्णी इ.च्या प्रतिसादांवरून जाणवलं कि कदाचित माझी काही गृहितकं चुकीची असू शकतात. पण मुंबईत विकत घेतलेला नोकिया ६३०० मी स्वतः वापरला नि त्यात देवनागरी लेखन नव्हतं हे मी सांगू शकतो. नोकिया ६२३३ च्या बाबतीत कृष्णकुमार / माधव म्हणतात त्याप्रमाणे माझं संशोधन कमी पडलं.
या गोष्टी नेट संशोधनानं आजमावण्यासाठी फार अवघड आहेत. कुठलाही उत्पादक मोठ्या गौरवाने 'देवनागरी लेखन / सहाय्य' या गोष्टीचा समावेश त्या त्या उपकरणाच्या उल्लेखनीय गुणविशेषांमध्ये तर मांडत नाहीच, पण तांत्रिक टिपणातही उल्लेखत नाही.
असो. पण एक कानगोष्ट अवश्य अवलंबावी नि पसरवावी - ती म्हणजे कुणालाही नवीन मोबाईल घ्यायचा असल्यास महागातल्या महाग वा स्वस्तातल्या स्वस्त उपकरणासाठी देवनागरी लेखन - वाचनाची सोय असावी अशी एक अट दुकानदाराला आपण घालावी. जास्तीत जास्त लोकांकडून अशी मागणी झाल्यावर ती मागणी त्या त्या कंपनीच्या विपणन विभागाकडे पोचती होईलच.