कविता आवडली. त्यातील भावना प्रातिनिधिक आहेत , कुठल्याही संवेदनक्षम मनाच्या माणसाला जे वाटेल ते मांडले आहे. समाजपुरुषाशी जोडलेले राहावेसे वाटणे आणि जरा स्पर्श झाला की ओंगळवाणे वाटावे असे त्याचे दर्शन घडणे यातली जीवघेणी तगमग ही आजच्या काळात जगणाऱ्या प्रत्येक माणसाच्या शतखंडित अशा अस्तित्त्वाचा एक तुकडा आहे. माणसे हवीत , पण घुसमटणाऱा मॉब नको. समजोन्नती, लोकजागरण हवे पण हिडीस , ओंगळवाणे आणि लोकोपद्रवी काही नको अशी ही मोठी बिकट वाट आहे.
या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीतच आणि प्रसंगी ती कटू अशीही असतात. स्वच्छतेला, अनमोल अशा व्यक्तिगत खाजगीपणाला , एकूणच आयुष्यातल्या दर्जेदारपणाला "सर्व काही समष्टीसाठी"च्या वेदीवर बळी द्यायचे , का लोकांपासून, त्यांच्यातील ऊर्जेपासून, सतत चालणाऱ्या समाजातल्या मंथनापासून दूर , एकलकोंडे , माणूसघाणेपणाचा ठपका येईल असे आयुष्य जगायचे ? दोन्ही पर्याय क्लेशकारकच. आणि दोन्हीचा सुवर्णमध्य साधणे दिवसेंदिवस कठीण बनलेले.