प्रसिद्ध, प्रज्ञावंत व्यक्तीचा / ची जीवनसाथी असणे हा बहुदा काटेरी मुगुटच असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातले बहुदा सगळ्यात प्रसिद्ध जोडपे पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे. पण या आदर्श जोडप्यातले विसंवाद, बेबनाव वाचले (आहे मनोहर तरी) की इथूनतिथून सगळी मातीचीच माणसे हे पटू लागते. ना.सी. फडक्यांनी तर आपण आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटानंतर किती पैसे दिले हेही जाहीर केले होते म्हणे! काशीनाथ घाणेकरांसारख्या संवेदनशील पण बेताल कलावंताला सांभाळणे म्हणजे तळहातावर निखारा ठेवण्यातला प्रकार हे कांचन घाणेकरांचे पुस्तक वाचून कळते (नाथ हा माझा). महर्षी कर्व्यांबद्दल इरावतीबाईंनी म्हटलेले 'माझे भाग्य की मी त्यांची सून झाले, पण माझे त्याहून मोठे भाग्य की मी त्यांची पत्नी झाले नाही' हे वाक्य बरेचसे सांगून जाते.
टॉलस्टॉयच्या लैंगिक हिंसाचाराला सामोरी जाणारी त्याची पत्नी आणि पत्नीच्या बाळंतपणाची व्यवस्था करायला म्हणून बाहेर पडलेल्या आणि तीन दिवस सतत जुगार खेळून, सगळे पैसे हरून परत येणाऱ्या दोस्तोव्हस्कीची बायको ही उदाहरणे आहेतच.
शेवटी लेखक, कलावंताच्या जीवनाचा हा अनोळखी भाग रसिकांसमोर येणे आवश्यक आहे का, असा एक प्रश्न पडतो. त्या कलेपलीकडे तो एक सामान्य माणूस आहे आणि त्याच्या आयुष्यात त्याचे गंड, पूर्वग्रह, सवयी, व्यसने, विकृती हे सगळे आहे. पण त्याचा त्या कलेशी काय संबंध? कुमार गंधर्वांनी व्हिस्कीचा एक पेग जादा घेऊन भानुमतींच्या आठवणींनी कोसळत जाणे हे वाचायला कितीही रंजक असले तरी त्याचे कुमारांच्या गाण्याशी काय नाते आहे? 'अण्णा बैठकीला आले ते तर्र होऊनच' म्हणणाऱ्या श्रोत्याला बैठकीतल्या गाण्याशी जास्त मतलब असतो की अण्णांच्या तर्र होण्याशी?
पण पब्लीक फिगर्स असलेल्या लोकांच्या खाजगी आयुष्यात लोकांना फार म्हणजे फारच रस असतो, हे बाकी खरे.