माफ करा पण अमिताभ बच्चन या व्यक्तीला मनसे किंवा तत्सम विचारसरणीच्या लोकांचा विरोध आहे हे मिडीयाने सोयीस्कररीत्या पसरवले आहे. विक्रोळीच्या ज्या सभेपासून बच्चन हे नाव मनसेशी संबंधित झाले त्या भाषणाची चित्रफीत पाहिली तर त्यात ठाकरेंचे म्हणणे असे होतेः
"एवढा मोठा अमिताभ बच्चन हा अभिनेता पण जेव्हा निवडणूक लढण्याची वेळ आली तेव्हा उत्तरप्रदेश राज्य निवडले. उद्योगधंदे किंवा गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ब्रँड अँबेसिडरशिप करण्याची वेळ आली तेव्हा उत्तरप्रदेश हे राज्य निवडले. मुलींसाठी शाळा सुरू करण्याची वेळ आली तेव्हा उत्तरप्रदेशात ती सुरू केली. आता इतके जग फिरलेल्या, परराज्यात कर्मभूमी असलेल्या थोर अभिनेत्यालाही त्याच्या राज्याचा इतका अभिमान आहे, प्रेम आहे तर राज ठाकरेला ते का असू नये?"
या संपूर्ण परिच्छेदात बच्चन विरोध कुठे दिसतो?
कालपरवा झालेले जयाबच्चन प्रकरण हे तर मिडीयाच्या आणि राजकारण्यांच्या (किंवा विचारवंतांच्या) दुटप्पीपणाचे उदाहरण आहे. 'महाराष्ट्रात राहून (मराठी येत असूनही - जयाला चांगले मराठी येते आणि हे स्वत: बच्चनने लिहिले आहे - ) आम्ही यूपीवाले आहोत म्हणून आम्ही हिंदीतच बोलणार हे म्हटले की लगेच 'हा अभिव्यक्तीस्वातंत्र्य किंवा घटनादत्त अधिकारांचा अविष्कार आहे.' 'प्रत्येकाला आपली संस्कृती आणि भाषा जपण्याचा अधिकार आहे' हे सांगितले गेले. मात्र महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी (फक्त महाराष्ट्रातच) मराठीत पाट्या हव्यात, (जे महाराष्ट्राच्या आणि मुंबई महापालिकेच्या कायद्यात आधीच नमुद केले आहे.) महाराष्ट्रात असताना मराठीत बोलावे असे म्हटले की ती झाली संकुचित वृत्ती. महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे हा कायदा आहे.
या कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली की लगेच ती संकुचित वृत्ती होते.