आता माफी मागून झाली करून झाली तर सगळे विसरून गुण्यागोविंदाने नांदावे की नाही ते नाही. मराठी माणसाचा संकुचित पणा पुन्हा दिसून आला तो कसा ते पाहा.

सकाळातली आजजी बातमी :

अमिताभच्या "द लास्ट लिअर'चा शो प्रेक्षकांअभावी रद्द!

पुणे, ता. १२ - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या "द लास्ट लिअर' या नव्या चित्रपटाचा "फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रेक्षकांअभावी रद्द झाला!
"कोथरूड सिटीप्राइड'मध्ये आज सकाळी नऊचा खेळ झालाच नाही. अमिताभच्या भाळी हे "भाग्य' यापूर्वी कधी आले नव्हते. "द लास्ट लिअर'ने ही कमतरताही पूर्ण केली. अन्य चित्रपटगृहांतही या चित्रपटाला प्रेक्षकांनी थंडच प्रतिसाद दिला!

सकाळी ८. ५५ वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने "बॉक्स ऑफिस'वर जाऊन, "लिअर'च्या तिकिटाची विचारणा केली असता, "शो' रद्द झाल्याचे धक्कादायक उत्तर ऐकायला मिळाले. अन्य चित्रपटांना नेहमीप्रमाणे गर्दी होती. मात्र, "लिअर'चे तिकीट काढावेसे त्यातील एकाही प्रेक्षकाला का वाटले नसावे? अमिताभला सामान्य जनतेने अद्याप "मनसे' माफ केले नाही, असाच याचा अर्थ घ्यावा काय, अशी चर्चा तेथे सुरू होती.

"सिटीप्राइड कोथरूड'च्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता, प्रेक्षक नसल्यानेच हा खेळ रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय "द जर्नी इन टू सेंटर ऑफ अर्थ'चाही खेळ प्रेक्षकांअभावी रद्द झाला. अनेकदा असे खेळ रद्द होण्याचे प्रकार घडतात. विशेषतः बुधवार, गुरुवारी हे प्रकार नित्याचेच आहेत. मात्र, शुक्रवारी पहिलाच खेळ, तोही अमिताभच्या चित्रपटाचा, रद्द होण्याची ही घटना दुर्मिळच.

पुण्यातील इतर मल्टिप्लेक्सचा कानोसा घेतला असता, ऍडलॅब्ज (चिंचवड) व "फेम जय गणेश' (आकुर्डी) येथे या चित्रपटाचा एकही खेळ लावला नसल्याचे स्पष्ट झाले. गोल्ड ऍडलॅब्ज (कल्याणीनगर) येथे केवळ दोन खेळ आहेत. दुपारी पाऊणच्या खेळाला जेमतेम निम्मे प्रेक्षागृह भरले होते, असे सांगण्यात आले. "आयनॉक्स'मध्येही दोनच खेळ आयोजित करण्यात आले असून, सकाळच्या खेळाला अवघे ५०-६० प्रेक्षक होते, अशी माहिती मिळाली. "ई-स्क्वेअर'मध्ये चार खेळ असून, आजच्या तीन खेळांना साधारण ५० ते ७० टक्के प्रेक्षक उपस्थित होते, असे सांगण्यात आले.

बातमी येथे आहे : अमिताभच्या "द लास्ट लिअर'चा शो प्रेक्षकांअभावी रद्द!