हे जग खरंच एकाच लॉजिकने चालतं का? माझा तर ह्या बाबतीत बराच गोंधळ आहे/ होतोय. अनेक नियम, अनेक अटी आपल्या आयुष्यावर आपला अंमल दाखवत असतात. बहुतांशी मराठी माणसं समोरील अनोळखी व्यक्तीशी (माझ्या अनुभवावरून मुंबईतले) आपसूखच हिंदीतूनच बोलू लागतात. पण असं का होतं?
ट्रेनने प्रवास करताना जी भयानक गर्दी असते ती पाहून खूप दु:खी व्हायला होतं. वाटतं ही सगळी मंडळी इथं फक्त 'पैसा' कमवायला आली आहेत. पण त्यांच्या इथं येण्याने मला सुखानं, शांततेनं प्रवासही करता येत नाही.
ट्रेनमध्येही काही कारणाने मराठी भाषिक व इतर भाषिकामध्ये भांडण होते तेव्हा सुरवात होते तीही हिंदीतूनच, जेव्हा ती मराठी व्यक्ती तंटा टीपेला पोचतो तेव्हा मराठीतून आरडा-ओरडा करून समोरच्या व्यक्तीवर 'तू परका आहेस, तू इथला नाहीस तेव्हा तू नमते घ्यायला हवे' अशी भावना आणत चरफडते. ते दृश्य खूप दयनीय असते. पण असं का होतं?
मराठी जपत बसलो तर अमराठी मित्रांना तोडायचं का? (शिवसेना प्रमुख ही अमराठी मित्रांना ह्याच मुळे धरून आहेत ना?)
मी स्वतः रेल्वेच्या निमसरकारी आस्थापनात काम करतो. सलग पाच वर्षापासून, लालू मंत्री झाल्यापासून आमच्या कंपनीत २० च्या वरती फक्त बिहारची मंडळी भरती झाली आहेत. फक्त एकच मराठी तो ही अपंग विभागातून भरती झाला. ह्या अनेकांना कंपनीच्या कोट्यातून घरे ही मिळाली. ह्या मंडळीचे आता नातेवाईक ही त्यांसोबत राहत आहेत.
हे फक्त उदाहरणासाठी. सांगायचा मुद्दा हा आहे की 'मराठी भाषा जगवायची कशी? ' हा वेगळा विषय आहे. व 'मराठी माणूस जगवायचा, टिकवायचा कसा? ' हा वेगळा मुद्दा आहे. सध्यातरी राज ठाकरे स्वत:च्याच राजकीय अस्तित्वासाठी झगडताहेत. तेव्हा आशुतोश आपण व आपल्या सारखे अनेकजण ह्या दोनही वेगळ्या विषयांची गल्लत तर करीत नाही आहात ना? समस्या वेगवेगळ्या पाहूनच त्या व्यवस्थित सोडवता येतील असं नाही का वाटत?