एक्झॉर्सिस्ट या चित्रपटाच्या नवनवीन आवृत्ती (रात, भूत, फूंक) काढून प्रेक्षकांच्या माथी मारण्यापेक्षा रामूला हॉलीवूडात इतरही भयपट आहेत याची जाणीव करून देणे गरजेचे आहे पण ती जाणीव तरी कशाला करून द्यायची म्हणा... नाहीतर आणखी एक भिकारपट माथी मारला जाणार.  

चित्रपटाला सहा कोटीतरी का लागले असावेत हे कळत नाही. दोन चार पडेल नायक नायिका, उतरणीला लागलेले, अंगाने सुटलेले आणि चेहऱ्यावरील मठ्ठ भावांत तू पहिला का मी पहिली अशी स्पर्धा लावणारे दोन तीन तथाकथित टिव्ही तारे, दोन लहान मुलं, एक जुनाट बंगला आणि काही चित्रविचित्र ब्रॉंझचे मूर्ती/ पुतळे यांच्यासाठी इतकेही भांडवल लागत नसावे. (कदाचित, फांदीवरचा कावळा सगळ्यात जास्त पैसे मागत असावा  ) एखाद कोटीत झाला असता तर बॉक्सऑफिसवर सुप्पर ड्युप्पर हिटही ठरला असता.  

चित्रपटांत त्या भयानक मूर्तींचा इतका वापर आहे की गणपतीची मूर्ती इतकी भेसूर दिसू शकते हे रामूपटातच कळले. घरात इतक्या चित्रविचित्र मूर्ती ठेवणाऱ्या माणसांना आणखी भूत कशाला हवे होते कोणास ठाऊक.

रामूचा कॅमेरामन बहुधा मनुष्ययोनीत नसावा कारण आपल्या दोन पायांवर उभं राहून आणि कॅमेराला बहुधा तीन पायांवर उभं करून चित्रपटाचे शूटींग करता येते ही त्याच्या माहितीतली गोष्ट नसावी. सरकारराज चित्रपटातही कॅमेरा असाच कुठेतरी भरकटत असतो. फूंकमध्येही तेच.

हा चित्रपट एकट्याने पाहून पाच लाख मिळवण्यासारखे काहीही नाही. पाहून पाच लाखांपेक्षा तिकिटाचे पैसे परत केले तरी खूप झाले म्हणायची वेळ आहे आणि तसेही या चित्रपटापेक्षा -

"रामगोपाल वर्मा के शोले सहकुटुंब सहपरिवार संपूर्ण बघा आणि पाच लाख रूपये मिळवा." अशी जाहिरात अधिक सयुक्तिक ठरली असती.