शोभा डे आणि मराठी भाषा व मराठी संस्कृती यांचे नातेसंबंध तपासून पाहणे ही एक रोचक प्रक्रिया ठरू शकेल. आणि त्यामागील डेबाईंच्या ३ दशकांच्या कारकिर्दीचा, बदलत्या बाजारपेठेचा संबंधही लक्षात घ्यावा लागेल. सुमारे २००० सालापर्यंत बाईंनी मराठी भाषेत एक अक्षर लिहीणे-बोलणे, मराठी साहित्य-वृत्तपत्रकारिता-संवादमाध्यमे यांच्याशी दूरान्वयानेही संबंध येऊ देणे, आपला मराठी भाषेशी सुतराम संबंध येऊ देणे हे सर्व कटाक्षाने टाळले आहे. सत्तरीच्या दशकात त्या मॉडेलींगनंतर "स्टार-डस्ट"सारख्या इंग्रजी मासिकामध्ये गॉसिप लिहायच्या आणि नंतर त्याच्या जोरावर त्या संपादिका बनल्या. त्यांच्यापूर्वी जर गॉसिप पत्रकारिता सूचक, "टंग इन चीक" होती तर त्यांनी घडविलेल्या "क्रांती"मुळे ती कसलेही धरबंध न राहिलेली "खुल्लम-खुल्ला" बनली. आपल्या या भारदस्त अनुभावाच्या जोरावर त्यानी इंग्रजी ललित-लिखाणाच्या पाण्यात मुटका मारला. बस्स. "फूल्स रश इन, व्हेअर एंजल्स फिअर टू ट्रीड.. " अशातली गत. ललित लिखाणात तर "निर्मितीक्षमतेला" भरपूर वाव. मग वास्तवजगातल्या माणसांवर बेगळ्या नावाचे मुखवटे चढवून त्यांच्यावर नवनवीन "मसालेदार" वैशिष्ट्यांचे आरोपण करून कथा-कादंबऱ्या आल्या. याच लोकप्रियतेच्या यानावर स्वार होऊन मग टाईम्स ऑफ ईंडीया मध्ये पदार्पण. ९० च्या दशकात "टाईम्स" सुद्धा "टॅब्लोईड" बनण्याच्या दृष्टीने कूस बदलत होताच. डे सारख्यांचे टाईम्स मधील पदार्पण आणि दीर्घ वास्तव्य ही घटना अर्थपूर्णच आहे.
मग, मराठी संस्कृतीच्या वाऱ्यालाही उभे नसणाऱ्या अशा व्यक्तिमध्ये अचानक "मराठी बाणा" कुठे आला? त्याचे असे झाले की, मुक्त बाजारपेठेच्या कालावधीमध्ये मराठी समाजाचेही उद्योग-मनोरंजनादी "ग्लॅमर" आणि वैभवी-दिमाखदार क्षेत्रांमध्ये प्रतिबिंब पडायला लागले. मराठी लोकंकडेही पैसा खेळू लागला. मुख्य म्हणजे, डे बाईंच्या पुस्तकांची मराठी भाषांतरे झाली, हातोहात खपली. बस्स. अचानक "आपल्या रूटस" कडे वळणे क्रमप्राप्त होतेच. "सामाजिक समालोचक" अशा पदवीप्राप्त व्यक्तिने इतर ठिकाणी जे केले तेच येथेही : टीका, समालोचन, मतांच्या पिंका, उपदेश, मराठी माणसांच्या चुका दाखविणे. सौ गॉसिपकॉलम के चूहे खाकर डेमॅडम निकली पंढरपूर यात्रापे.
असो. एखादी व्यक्ती काय म्हणते आहे याचे महत्त्व मी नाकारत नाही. पण त्या त्या म्हणण्याला काय काय संदर्भ आहेत हे माहित असणे केव्हाही योग्य. मराठी मणसांबद्दलच्या डे बाईंच्या मुद्द्याला विरोध नाहीच. त्या म्हणतात ते एक सामान्य ज्ञान आहे. पण त्यांच्या भूमिकेमागची कथा ही अशी आहे.