आपण वर नमूद केलेले निकष (निष्कर्ष?) सिद्ध करण्यासाठी अधिक लेखन करावे अशी अपेक्षा आहे.

२. महाभारतामध्ये युरेनस, नेप्च्यून, आणि प्लुटोचा देखिल उल्लेख आहे.
३. यामध्ये "टेस्ट ट्यूब बेबी, इलेक्ट्रोप्लेटिंग, केमिकल सेल" सारख्या अत्याधुनिक संशोधनाचा पूर्ण उल्लेख
आहे.
४. "जेनेटिक्स(जनुके)" याबाबतीत तर पाश्चात्यांना लाजवणारे तत्त्वज्ञान समाविष्ट.

वरील विधानांबाबत एवढेच म्हणू शकतो की केवळ उल्लेख असणे वेगळे आणि त्या त्या गोष्टींचे इत्थंभूत वर्णन असणे किंवा त्या त्या तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती असणे वेगळे.
माणसाजवळ कल्पनाशक्ती नावाची एक जबरदस्त शक्ती आहे. ह्याच शक्तीच्या जोरावर 'बॅक टु द फ्यूचर'सारखे चित्रपट निघतात. अजून काही हजार (किंवा लाख) वर्षांनी जर आपल्या पुढील पिढ्यांतील कोणाला अशा चित्रपटांच्या सीड्या/कॅसेटी मिळाल्या तर त्यातून तेदेखील 'इसवी सनाच्या विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील आपल्या पूर्वजांकडे टाइममशीन होते.' असा निष्कर्ष काढू शकतील. पण तो निष्कर्ष केवळ हास्यास्पद असेल.

इलेक्ट्रोप्लेटिंग, टेस्ट ट्यूब बेबी, केमिकल सेल किंवा यांसारखे इतर कोणतेही तंत्रज्ञान त्याकाळी अस्तित्वात होते हे सिद्ध करण्यास पौराणिक कथांमध्ये केवळ त्यांचा उल्लेख असणे पुरेसे नाही. गांधारीचा गर्भ द्रोणात ठेवून (? ) तुपात वाढवला गेल्याचा उल्लेख त्याकाळी आपल्या पूर्वजांना 'टेस्ट ट्यूब बेबी'चे तंत्रज्ञान अवगत होते हे सिद्ध करण्यास पुरेसे नाही.

बाकी आपण म्हणता त्याप्रमाणे खरोखरीच सभोवतालच्या लोकांची मते ऐकल्यावर/वाचल्यावर ग्लानी येते. विचारस्वातंत्र्य/लेखनस्वातंत्र्य वगैरे अधिकारांची फाजील जाणीव लोकांना झाली असावी असेच वाटते.
'महाभारत किंवा तत्संबंधित तात्त्विक विवेचन न वाचताच अनेक लोकांनी महाभारताविषयी आपापले जाहीर मत प्रतिपादिले असते' ह्याबाबतदेखील मी आपल्याशी सहमत आहे. 'मुळात अनेक जण एखाद्या गोष्टीचा गंध नसताना तिच्याविषयी उलटसुलट मते बनवतात' हेदेखील खरे वाटते.

- चैत रे चैत.