ह्या सदरामुळे दोन कवितांची आठवण झाली. तांब्यांची 'रिकामे मधुघट' आणि  बोरकरांची 'कांचनसंध्या'. दोन्ही माझ्या आवडत्या कविता. पण वृद्धत्त्वाबद्दल तांबे म्हणतात-

 "ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया,
अता मधूचे नाव कासया?
लागले नेत्र रे पैलतिरी"

तर कांचनसंध्येमध्ये बोरकरांनी म्हातारपणाला सोनेरी आशावादाची झालर लावली आहे.

कांचनसंध्या

पिलांस फुटुनी पंख तयांची घरटीं झाली कुठे कुठे,
आता अपुली कांचनसंध्या मेघडंबरी सोनपुटें.
कशास नसत्या चिंता-खंती वेचू पळती सौम्य उन्हे,
तिमिर दाटता बनुनि चांदणे तीच उमलतील संथपणे.
सले कालची विसरुनी सगळी भले जमेचे जिवीं स्मरू,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू.
उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे,
तरी समुद्रायणीप्रमाणे पोसूं तटिंची म्लान तृणे.
इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी वाहे अपुल्या मुळी-तळी,
असूं तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.
शिणुनी येती गुरे-पाखरे तीच लेकरे जाण सखे,
दिवस जरेचे आले जरि त्यां काठ जरीचा लावू सुखे.

(ही कविता बोरकरांच्या कांचनसंध्या ह्या संग्रहात आहे.)