इथे आपल्या सोयीनुसार पुरावे मानणे न मानणे सुरू आहे असे वाटते.

जर व्यासांनी लिहिलेले महाभारत आणि सौतीने भर घातलेले महाभारत वेगळे असण्याला पुरावा नाही तर अगस्तींनी असे श्लोक लिहिले असे म्हणण्यालाही पुरावा नाहीच की. कोणा मध्ययुगीन कवीने ते अगस्तींच्या नावावर खपवले असण्याचीही शक्यता आहेच.

संस्कृत जाणकार त्या श्लोकांचा फडशा पाडतीलच परंतु जे काही अत्यल्प ज्ञान मला आहे त्यावरून हे श्लोक इलेक्ट्रोप्लेटिंगचे वाटत नाहीत. महाभारतातील शस्त्रास्त्रांचे वर्णन खरे असल्यास कोठेतरी, इतरत्रही या शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कारखान्यांबाबत, प्रयोगशाळांबाबत, व्यवसायाबाबत इ. लेखन झाले असते. ऋषींनी श्लोक म्हणून प्रयोगपूर्ती केली असे वाटत नाही.

टेस्ट ट्यूब बेबी वगैरे सारख्या जैविक शोधांसाठी लागणारे नियंत्रित तापमान, शितपेट्या, निर्जंतुक उपकरणे यासाठी अनेकविध संशोधनांची गरज असते. ही सर्व संशोधने त्याकाळी झाली होती काय? तसे असल्यास इतक्या प्रगत संस्कृतीचे नामोनिशाण पुसले कसे गेले असावे. खोदकामात, उत्खननात कोठेतरी भांड्यांचे कपचे, मणी, खेळणी इ. सोबत विविध धातूंच्या तारा, शितपेट्या, यंत्रे, शस्त्रास्त्रे यांचे अवशेष सापडले असते. (अशी वेळ आली की मग वेदांचा काळ २३००० का २३०००००० वर्षेही मागे जाऊ शकतो. महाप्रलय झाले आणि सगळे धुवून गेले म्हटले की सुटलो  )

वर हॅम्लेट यांनी लिहिल्याप्रमाणे महाभारतात रेशीम, साखर इ. माहित नव्हते. सिंहासनाचा वापर इ. केला जात नव्हता. रामायण, महाभारत काळात नाणी नव्हती.

आता महाभारत महाकाव्य असण्याबाबत,

महाभारत हे महाकाव्यच आहे कारण त्याची रचना काव्याची आहे. उदा. एखादी सत्यघटना लेखक कथास्वरुपात लिहितो त्यावेळेस ती फुलवण्याकरता, रुचीपूर्ण बनवण्याकरता त्यात नाट्य भरतो, संवाद तयार करतो, मीठ-मसाला लावतो. याचा अर्थ तो कथेचा मूळ गाभा बदलतो असे नाही पण त्यात काही नाट्यपूर्ण प्रसंग वाढवतो. यात अवमानकारक असे काही नाही. उलट यातून लेखकाची प्रतिभा दिसून येते.

होमरच्या ओडिसीमध्ये ज्या स्थळांचे दाखले आहेत, भौगोलिक दृष्ट्या ती स्थळे अस्तित्वात आहेत परंतु सायक्लॉप्ससारखे राक्षस आणि सायरन या सुंदरी अस्तित्वात होत्या असे कसे म्हणता येईल? ज्यूल्स व्हर्नच्या ट्वेंटी थाउजंड लीग्ज अंडर द सी मध्येही भौगोलिक समुद्रांचा, पाणबुडीचा उल्लेख आहे म्हणून कॅप्टन नीमो आणि नॉटिलस ही पाणबुडीही खरेच अस्तित्वात होती असा निष्कर्ष अजून ५०० वर्षांनी कोणी काढला तर त्याला खरे मानायचे काय?