'दहशतवादी' असे एकच लेबल विविध दहशतवादी गटांना लावणे ही आपण पहिली चूक करतो आहोत असे मला वाटते. इस्लामी दहशतवादी हे कम्युनिस्ट / नक्षलवाद्यांपेक्षा भिन्न आहेत. त्यांचे हेतू भिन्न आहेत, त्यांचे लक्ष्य भिन्न आहे आणि त्यांचे मार्गही भिन्न आहेत. याउलट तमिळ वाघ,खलिस्तान, उल्फा किंवा बोडो हा अजूनच वेगळा प्रकार आहे. बजरंग दलासारख्या संघटनांना अजून तिसरे माप लावण्याची आवश्यकता आहे.

यात महत्त्वाचा भाग म्हणजे हेतू. दुसऱ्या दोन प्रकारातील संघटना या प्रतिक्रियात्मक आहेत. त्यांचा साधा विचार असा की, "माझ्या अस्तित्वाचा प्रश्न जिथे उभा राहील तेथे मी शस्त्राचार वर्ज्य मानणार नाही. " मात्र इस्लामी, कम्युनिस्ट किंवा तत्सम संघटना मात्र भिन्न आहेत. त्यांचा विचार हा एका दृष्टीने मानवतेचा विचार आहे. आपल्याला जी मानवता वाटते ती मानवतेची निरपेक्ष कल्पना नसून इतरही काही कल्पना अस्तित्वात आहेत. सर्व कल्पनांचे एक प्रकारे मूळ असे आहे, की ही कल्पना तेवढी सत्य आहे आणि बाकी सर्व या जगाला विनाशाच्या खाईत नेतील. त्यामुळे आपल्या मानवतेच्या, किंवा धर्माच्या (इथे 'religion' अशी गल्लत कृपया करू नये) कल्पना इतरांना कशा पटवता येतील असा हा मूळ हेतू असतो. हा हेतू लक्षात घेतल्यास दहशतवादाची समस्या का उद्भवते आणि त्यावर तात्कालिक तसेच दूरगामी उपाय कोणते याचा विचार करता येईल.