चेतन,

१) "महाकाव्य म्हणजे लेखकाची केवळ काल्पनिक भरारी असा सरळ साधा अर्थ निघतो." हे आपले विधान चुकीचे आहे.

संस्कृतमध्ये कवि = द्रष्टा, बुद्धिमान, विचारवंत. कवि ची अभिव्यक्ती = काव्य. आकाराने आणि दर्जाने मोठे काव्य = महाकाव्य.

महाकाव्य हा शब्द ज्या अर्थाने निर्माण झाला तो आपण मानत नाही असे दिसते. हा शब्द आपण आपल्या मनातील अर्थाने वापरू नये. त्याने आपल्या वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे.

२) "यापैकी, पुराणाला इतिहास म्हणून महत्त्व नाही. तरी देखिल त्याचासुद्धा विचार करू." हे आपले विधान तर खुद्द भारतीय ग्रंथ परंपरेच्या मताशी विरोध दर्शविणारे आहे. परंपरा विशेषतः पुऱाणाला इतिहास या नावाने ओळखते! आणि इतिहास या शब्दाचा जो अर्थ आपण मांडला आहे, त्या अर्थी देखील पुऱाणांचा उपयोग मोठा आहे. पुराणांत अतिरंजित कथा जरी आढळत असल्या तरी Historical Facts and Records  या अर्थाने मोठा तथ्यांश असलेला इतिहास सापडतो! शंका असल्यास भारतीय इतिहास तज्ञांचा सल्ला आपण घेऊ शकता. खुद्द डॉ. प. वि. वर्तक देखील असेच सांगतील.

३) महाभारतात राधा या व्यक्तीचा उल्लेख नाही हे बरोबर आहे. हरिवंशात मात्र तो प्रथम आलेला आहे. हरिवंश हे महाभारताचेच परिशिष्ट असल्याने तो उल्लेख महाभारतातच आहे असे म्हणण्याचे स्वतंत्र्य देखील घेत येऊ शकेल. परंतु तेथे राधा हे कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही; तर विशेषण म्हणून येते. आपणांस आराधना हा शब्द माहित असेल. त्यात आ + राध् असा धातू आहे. अर्थ - उपासना करणे. अशी राधना करणारी एक भक्त स्त्री = राधिका /राधा होय. भागवत पुराणात देखील हा उल्लेख आहे. तेथे राधा ही व्यक्तिस्वरूप होऊन येते. मात्र कृष्णाची पहिली प्रेयसी वगैरे प्रकार येथेही आढळत नाही. गीतगोविंदात तो येतो हे आपले मत योग्य आहे.

४) शस्त्रास्त्रांची नावे आणि प्रकार हा त्या त्या काळातील समाजाच्या सामुहिक स्मृतीचा भाग आहे. तो कल्पित काव्यातही आणि इतिहास काव्यातही अगदी एकसारखा असू शकतो.

५) यासंदर्भात एक गोष्ट विचार करण्याजोगी आहेः सर्व शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष असतीलच असे सांगता येत नाही. त्यापैकी काही शस्त्रास्त्रे ही काल्पनिक सुद्धा असू शकतात. म्हणजे असे पाहा, १ शस्त्र क्ष मर्यादेपर्यंत प्रभावी आहे. मात्र त्यापुढे ते कुचकामी आहे. तर यापेक्षा प्रभावी शस्त्र काय असू शकेल? त्याचा विचार करून थोडी कल्पना लढवून एखदे काल्पनिक शस्त्र तयार करणे अशक्य नाही. अशा विचारातून पुढे तसे शस्त्र निर्माण होण्यास चालनाही मिळू शकते किंवा तो उल्लेख तसाच नुसता स्मरणात राहू शकतो व कालांतराने स्मरणातूनही निघून जातो. ही प्रवृत्ती आजच्या science Fiction चित्रपटांतूनही दिसून येतेच की!

६) व्यासाने एकट्याने महाभारत रचले हे आपले मत दुराग्रही वाटते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेने महाभारताची चिकित्सित आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. या आवृत्तीकरिता जगभरातून १२५९ हस्तलिखिते मागवून अभ्यासण्यात आली. शिवाय रज्मनामा हे महाभारताचे अकबराने करवून घेतलेले फ़ार्सी भाषांतरही अभ्यासण्यात आले. त्यातील कोणतेही १ हस्तलिखित पूर्णपणे दुसऱ्यासारखे नव्हते! दक्षिण भारतातील महाभारत आणि काश्मिरातील महाभारत यात तर जमीन आस्मानाचा फरक आहे. एकाच माणसाची रचना असती तर हा फरक एवढ्या प्रमाणात पडला नसता. आणि एवढ्या प्रमाणात म्हणजे किती असेल? महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीत सुमारे ८९००० श्लोक आहेत. यातील प्रत्येक श्लोकात पाठभेद आहेत, शिवाय आणखी सुमारे ७०००० श्लोक प्रक्षिप्त म्हणून बाजूला काढले आहेत! आणि या करिता एकमेव निकष आहे तो बाहुल्य. जो श्लोक जास्तीत जास्त प्रतींत आढळेल तो स्वीकारायचा. इतर त्या श्लोकाचेच पाठभेद किंवा प्रक्षिप्त ठरवायचे. व्याकरणशुद्धतेचा, रचनाशैलीचा, योग्यायोग्यतेचा, कालसुसंगतीचा, इ. निकष लावल्यास तर आपल्याला उपलब्ध असलेल्या महाभारतातील आणखी अनेक श्लोक प्रक्षिप्तच ठरण्याचा धोका आहे. महाभारत हा अनेककर्तृक आणि दीर्घकाळ घडत राहिलेला ग्रंथ आहे.

७) त्यामुळे त्यातील वैज्ञानिकच काय पण कोणतेही उल्लेख हे प्रत्यक्ष महाभारतकाळातलेच असतील याला काहीच प्रमाण नाही. त्यावरून ते ज्ञानच खोटे होते असे सिद्ध करण्याचा माझा उद्देश नाही मात्र ते आपल्याला वाटते तेवढे जुने मात्र नक्कीच नाही हे मान्य केले पाहिजे.

८) टेस्ट ट्यूब बेबी बद्दलचा विचार हा मुख्यतः गांधारीचा जन्माला न आलेला गर्भ १०० कुंभात विभागून ठेवला आणि त्यातून कौरवांचा जन्म झाला या घटनेवरून केलेला आहे. परंतु तत्कालीन संस्कृतीचा विचार करता त्यातील काही मुले गांधारीची आणि इतर धृतराष्ट्राला दासींपासून झालेली असण्याची शक्यताच जास्त आहे. आणि मानवाला थोड्या अश्लाघ्य असलेल्या गोष्टींना दैवी अधिष्ठान देण्याची प्रवृत्ती मोठी आहे. कुंभातील गर्भाची कथा ही त्याचेच प्रतीक असू शकते.

९) आणखी एक विचार आपण अवश्य करा. भारताला १००% वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह इतिहासलेखनाची परंपरा कधीच नव्हती. नालंदा इ. विद्यापीठांतील अनेक ग्रंथ जळाले हे बरोबर पण तेथील विद्वांनांपैकी कोणीही त्याच्या नकला नंतर केल्याच नसत्या का? कुठेतरी कोणत्या तरी ग्रंथात अर्धवट ज्ञान तरी उपलब्ध झाले नसते का? कोणत्यातरी प्रयोगाचे अवशेष; किमानपक्षी नोंद तरी सापडली नसती का? आणि नालंदा हे मोठे विद्यापीठ असले तरी सारे शोध केवळ तेथेच लागले होते का की जेणेकरून ते विद्यापीठ आणि तेथील विद्वानांचा अंत झाल्यावर आपल्या वैज्ञानिक प्रगतीचे कोणत्याही प्रकारचे अवशेष किंवा स्मृती सुद्धा आपल्या समाजाजवळ नाहीत?!!!

मर्यादेयं विराजते.