कानडीमध्ये गडि(ड)गे म्हणजे घागर, आणि नीर म्हणजे पाणी. यावरून मराठीत आलेला शब्द गडगनेर! लग्न नक्की ठरले की ज्याचे लग्न असेल त्या मुलाला(किंवा मुलीला) आणि त्याच्या कुटुंबीयांना घरी जेवायला बोलावून करावयाचा समारंभ. अर्थात, या जेवणाला वर किंवा वधू यातला एकजणच असतो. अशाच प्रकारे मुंज ठरलेल्या मुलासाठी केलेला कार्यक्रम. जो काही आहेर करायचा असेल तो तेव्हाच केला जातो. गडगनेरलाच केळवण असेही म्हणतात. (यात घागर, पाणी किंवा केळे यांचा काय संबंध ते माहीत नाही.) हा कार्यक्रम म्हणजे वधू किंवा वराला त्या निमित्ताने घराबाहेर काढून शेजारापाजाऱ्यांबरोबर थट्टामस्करी करण्यासाठी असावा. १८५२ साली प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थ-कॅन्डी कोशात हा शब्द आहे त्याअर्थी ही प्रथा फार जुनी असावी. हा दुवा क्र. १ पहावा.
.