माझं तरी मत आहे की संपूर्ण समाजाचंच स्वरूप बदलतंय, शैक्षणिक पातळी सर्वसाधारण स्तरावरच वाढतीये, दहशतवाद विरोधी पथकांची समर्थता वाढतीये त्यामुळे सहाजिकच दहशतवादाचं स्वरूप बदलणंही अपरिहार्य आहे. वर हर्षलनी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या दहशतवाद्यांचे वेगवेगळे हेतू, मार्ग आणि लक्ष्य आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचं समाजशास्त्रीय विश्लेषण करताना त्यांचा वेगवेगळाच विचार करावा लागेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहशतवादी नक्की कोणाला म्हणायचं. मागे एका पकडलेल्या दहशतवाद्यानं (मला नक्की नाव आठवत नाही) स्वतःची तुलना भगत सिंगाबरोबर केली होती आणि विचारलं होतं की जर भगत सिंगाला स्वातंत्र्य योद्धा म्हटलं जातं तर त्याला का नाही? अर्थातच दहशतवाद्यानं स्वतःची तुलना भगतसिंगाबरोबर करणं मूर्खपणाचं आहे पण माझा मुद्दा असा आहे की तुमच्या माझ्या दृष्टिनं जो दहशतवादी आहे तो कदाचित तिसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी दहशतवादी नसेलही आणि त्यामुळे त्यांची व्याख्या ठरवणं आवश्यक आहे.
अवांतर : रेबॅनचा गॉगल लावून, मावा किंवा पान खाऊन रस्त्यावरून पिंका टाकत किंवा रस्त्यावरून वेडीवाकडी मोटारसायकल चालवत आणि बायकांची टिंगल टवाळी करणारे किंवा उगाचच दुसऱ्यांना शिवीगाळ आणि दादागिरी करणारे गल्लीगुंड अर्थात पावटे म्हणजेही एकप्रकारचे दहशतवादीच. त्याही दहशतवादाचं स्वरूप बदलतंय आणि आपल्या सारख्यांना शहरात राहण्याची शिसारी यावी इतकं ते घाणही होत चाललंय. असं आपल्याला नाही वाटत?