विनम्र आणि आजानुकर्ण या दोघांच्याही बोलण्यात तथ्य आहे.

सासूबाईंकडून असे ऐकले आहे की लग्नकार्याच्या तयारीत त्या घरातील मंडळी थकून भागून जातात मग त्यांना स्वयंपाकाचा त्रास नको या भावनेने शिवाय मदतीचा हात पुढे करता येईल या भावनेने केळवण केले जाते. केळी हे सुफलनाचे प्रतीक आहे त्यामुळे केळीच्या बागेत हा कार्यक्रम केला जाई म्हणून हे केळवण!

प्रत्यक्ष केळवणाच्या चालीचा अभ्यास केला तर हे सारे खरे आहेच मात्र याला एक समाजशास्त्रीय पार्श्वभूमीसुद्धा आहे.

वस्तुतः केळवण ही प्रथा नवऱ्या मुलीकरिता सुरू झालेली आहे. पूर्वी लग्नानंतर मुली खरोखरच परक्या होत असत तेव्हा लग्नाआधी तिला एकदा बोलावून, जेवणाखाण्याचे लाड पुरवून, तिला भेटवस्तू देऊन कौतुक करावे ही भावना त्यामागे आहे.

शिवाय, मुलीच्या बापाची आर्थिक परिस्थिती बेताची असे. नसली तरी लग्नाचा खर्च सगळा करावा लागत असे. त्यामुळे लग्नास मुलीकडची माणसे फारशी बोलावीत नसत. मग त्या माणसांच्या भेटीगाठी केळवणाच्या निमित्ताने होत. केळवणे लग्नाआधी होत असल्याने तेव्हा जे आहेर मिळतील त्याचा वापर लग्नात होऊन आर्थिक भार तेवढाच हलका होत असे.

अशा सर्व हेतूंनी केळवणाची प्रथा निर्माण झाली.

मग मुंजमुलगाही मुंजीनंतर "काशीस" जात असल्याने त्यासही केळवण सुरू झाले असावे.

नवऱ्या मुलास केळवण ही प्रथा खूप अलिकडची आहे. चूक असे त्यात काहीच नाही. ही नवी सुधारित प्रथा आहे असे म्हटले पाहिजे.