मराठीच्या तुलनेने इंग्रजी कितीतरी जास्त पुढारलेली आहे. तिच्यावर कुठल्या जातीचा पगडा आहे असे मला तरी वाटत नाही.
त्या भाषेत अनेक accent आहेत. अगदी अमेरिकेतही दक्षिणेचा एक, टेक्ससचा दुसरा, न्यू यॉर्कचा तिसरा, मिडवेस्ट असे अनेक प्रकार आहेत. त्यांचे अनेक उच्चार अगदी वेगळे असतात. कॅनडातही अनेक शब्द वेगळे उच्चारले जातात. about चा अबूट की कायसासा उच्चार केला जातो. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, भारत इथे बोलले जाणारे इंग्रजीही पार वेगळे असते. ब्रिटनमधे aluminium ला अल्युमिनियम म्हणतात तर अमेरिकेत अलूमिनम् च्या जवळ जाणारे काहीतरी. fast चा उच्चार ब्रिटनमधे फास्ट असा तर अमेरिकेत फॅस्ट असा करतात.
पण इतके फरक असूनही आमच्या साठी स्पेलिंगे बदला असा आग्रह होत नाही. color-colour, neighbour-neighbor, humor-humour, tyre-tire असे तुरळक अपवाद आहेत. माझा असा दावा आहे की उच्चारातील फरकांच्या तुलनेत स्पेलिंगातले फरक नगण्य आहेत. किंबहुना आम्ही ह्या शब्दाचा उच्चार असा करतो म्हणून त्याचे असे स्पेलिंग शुद्ध समजून स्वीकारा असे झाल्याचे ऐकिवात नाही. कारण इंग्रजीतील स्पेलिंग इतके सहज बदलले जात नाही.
मराठीतल्या आनि पानी कडे आपण वेगळा accent असा दृष्टीकोन ठेवला तर त्याकरिता स्पेलिंग म्हणजे लेखी मराठी बदलावे असा आग्रह रहाणार नाही. विशेषतः मराठी इतक्या छोट्या भागात बोलली जाते की त्याकरिता वेगवगळी स्पेलिंगे स्वीकारणे उचित वाटत नाही. याउलट अमेरिका आणि ब्रिटन ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत. अनेक शतके त्यांची संस्कृती वेगळी वाढलेली आहे. मराठीचे तसे नाही.
प्रत्येक विषयाला जातीय रंग देऊन एका जातीचा द्वेष करण्याकडे गाडी वळवण्याची वृत्ती खेदजनक आहे.