स्वरूपातच..... या ओळींची रचना मराठी बोली उच्चारांप्रमाणे केलेली आहे. म्हणजे शेवटचा अकार न उच्चारता. उदा. स्वरूपातच (= उच्चारी स्वरूपातच्).
असा तुमचा उद्देश असला, तरी तो कवितेच्या सुरवातीला स्पष्ट झालेला आणि कवितेत तो शेवटपर्यंत पाळलेला बरा असे मला वाटते.
उदा. विंदांच्या कवितेत
माझ्या मना बन दगड - हा रस्ता अटळ आहे
ह्या सलामीच्या दोन ओळीतच कवितेची प्रकृती आणि शब्दोच्चारांची अपेक्षा निःसंदिग्धपणे प्रकट होते. (बन् दगड् अटळ् असे उच्चार न केल्यास खटकते)
तुमच्या कवितेच्या
पूर्ण मी फुलणार आहे
आतला रस गवसला
मूक माझ्या भावनांतून
शब्दघन हा बरसला
ह्या सुरवातीच्या ओळी पाहिल्यास, त्यांत पूर्ण, घन, मूक इत्यादी शब्दांच्या वास्तव्यामुळे आणि 'फुलणार', 'रस' हे (फुलणार् रऽस् असे न उच्चारता) पूर्ण उच्चारणे खटकत नसल्यामुळे (... खरे तर रस ऐवजी रऽस् म्हटल्यास अर्थ किंचित वेगळाही होतो) ती अपेक्षा चटकन ध्यानात येत नाही. (असे मला वाटले) ...
कवितेत पुढेही कुंभ, स्वत्व, अव्यक्त असे शब्द असल्याने पूर्ण अकारान्त वापरण्याची खात्रीच होत जाते. त्यामुळे शेवटी स्वरूपातऽच् असे न म्हणता स्वरूपातच असे म्हणावेसे वाटते, असे वाटते.
(हे कवितेतील वैगुण्य सांगण्यासाठी लिहिलेले नाही. ह्याची कृपया नोंद घ्यावी.)