-आजानुकर्ण,
हार्दिक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!   
.........................


(नेहमीप्रमाणेच) कविता आवडली. तुम्ही नेहमी इतक्या सुंदर कविता लिहिता मात्र आम्हाला तेच ते शब्द वापरून स्तुती करावी लागते.

- नाही हो. माझ्या कवितेत तरी असे कोणते वेगळे शब्द असतात? मीही तेच ते शब्द वापरून तर लिहीत असतो कविता...! :) तुमचा त्याच त्या शब्दांमधील प्रतिसाद माझ्यासाठी नेहमीच नवा आणि ताजातवाना राहील!
.........................


तुमच्या बऱ्याच कविता या ३ ३ ओळींच्या कडव्यांमध्ये लिहिलेल्या असतात. या प्रकाराला काही विशेष नाव आहे का?

- 'मज श्यामसुंदरा तुझा लागला रंग '; तसेच 'काहीतरी सुचेल नवे आज ' अशा काही कवितांना अनुलक्षून तुम्ही हा प्रश्न विचारला असावा, असे वाटते (कारण ही कविता तर तशी नाही; या कवितेच्या कडव्यांची रचना ही वरील दोन कवितांमधील कडव्यांसारखी नाही.)
- अशा कविता हिंदी-उर्दूत मोठ्या प्रमाणावर लिहिल्या जातात. या काव्यप्रकाराला काहीतरी विशेष नावही असावे. (खूप मागे उर्दूमधील काव्यप्रकारांची जुजबी माहिती देणारी एक पुस्तिका वाचली होती मी. तिच्यात या काव्यप्रकाराविषयी वाचल्याचे स्मरते; पण त्याचे नाव मात्र आठवत नाही... ती पुस्तिका आता शोधून काढावी लागेल! ) 
*  *  *
पण या काव्यप्रकारात कविता लिहाव्यात, असे मला का आणि कसकसे वाटत गेले, त्याबद्दल पुढे सांगत आहे. तुम्हाला ते आवडेल, अशी आशा आहे...
..................
राजेंद्रकृष्ण यांची गाणी मला टीन एजमध्ये खूप आवडायची... (आजही तितकीच आवडतात. ) साधारणतः  १८-२० वर्षांपूर्वी विविध भारतीवर त्यांची गाणी वारंवार लागायची. ( मात्र, सिनेमासाठी ज्या काही उच्च, दर्जेदार कवींनी गाणी लिहिली, त्यात माझा सगळ्यांत आवडता आणि विचारसरणीशी मिळताजुळता कवी कोणता, तर तो साहिर. साहिर लुधियानवी. त्यानंतर कैफी आझमी, शकील बदायुनी.... या विषयावर एक वेगळा लेखच होईल... असो. )
त्यावेळच्या गाण्यांतलंच एक गाणं होतं -

हम से आया न गया, तुम से बुलाया ना गया ।
फासला प्यार मे दोनों से मिटाया ना गया ।
   (सिनेमा - देख कबीरा रोया)

हे पूर्ण गाणं इथं द्यायचा मोह होतोय... पण आवरतो आणि मला जास्त आवडणारं त्यातलं एक (दुसरं) कडवं देतो... ते असं -

क्या खबर थी, के मिले है तो बिछडने के लिए ।
किस्मतें अपनी बनायी है बिगडने के लिए ।
प्यार का ख्वाब सजाया था उजडने के लिए ।
इस तरह उजडा के फिर हम से बसाया ना गया ।

राजेंद्रकृष्ण यांचं हे गाणं माझ्या मनात अगदी घर करून बसलं... त्या काळात ऐकलेली अन्य गाणी आणि हे गाणं रचनेच्या दृष्टीनं वेगळंच वाटलं. दोन ओळींऐवजी त्यांनी तीन ओळींचं कडवं का लिहिलं असावं, असा विचार खूप दिवस केला आणि नंतर नंतर तो विचारही काळाच्या ओघात कुठेतरी वाहून गेला... असे 'गंभीर' विचार जास्त काळ डोक्यात ठेवण्याचं ते वयही नव्हतं!
याच दरम्यान असंच एक मराठी गाणं ऐकायला मिळालं. प्रासादिक कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या ना. घ. देशपांडे या आवडत्या कवीचं.   
मन पिसाट माझे अडले रे...
थांब जरासा...
याही गाण्यानं मनाला अक्षरशः पिसं लावलं (आणि पिसंही लावली! ) वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या या गाण्यानं मनाचा जो कब्जा घेतला तो घेतलाच.
याही गाण्याच्या कडव्यांची रचना राजेंद्रकृष्ण यांच्या वरील गाण्याप्रमाणेच होती... म्हणजे प्रत्येक कडव्यात तीन तीन ओळी.
उदाहरणार्थ -

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली... रे,
थांब जरासा!

असं सारं त्या वेळी कानावर पडत होतं... तीन तीन ओळींच्या कवितेच्या विचारांची ही अशी पायाभरणी मनात होत होती...
आता वळतो कळसाध्यायाकडं...!
वेगवेगळ्या कवींचे काव्यसंग्रह विकत घेणं आणि त्यांचा अधाश्यासारखा फडशा पाडणं हा त्या काळातील माझा नित्याचाच कार्यक्रम होता... असाच एका प्रदर्शनात 'एल्गार' हाती आला. झालं! त्या काळात दुसरं काही म्हणजे काहीच सुचेना... 'एल्गार'नं मनावर अक्षरशः गारूड केलं. सुरेश भट या अफलातून कवीची ओळख त्या संग्रहातून पहिल्यांदाच होत होती. या कविवर्यांची इतर पुस्तकं मिळवून वाचलीच पाहिजेत, असं मनानं घेतलं... तोवर त्यांच्या इतर काव्यसंग्रहांची नावंही ठाऊक नव्हती...! शोध घेता समजलं की, 'एल्गार'च्या आधी त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एक म्हणजे 'रूपगंधा' आणि त्याच्या नंतरचा 'रंग माझा वेगळा'. 'रूपगंधा' त्या वेळी कधीपासूनचाच दुर्मिळ होता. 'रंग माझा वेगळा 'ही त्या काळात दुकानांमधून सहजासहजी उपलब्ध नव्हता. पण १९९० सालातल्या एके दिवशी हाही संग्रह हाती पडला आणि... आणि साहजिकच पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचून झाल्यावरच तो खाली ठेवला... पुढे अनेकदा वाचला... वाचतच राहिलो...
लक्षात आले की, अरे, याही काव्यसंग्रहात तीन तीन ओळींची कडवी असलेल्या काही कविता आहेत...

कळते मज सारे कळते रे!
मन माझे तरिही चळते रे!

कळते मज तू अवखळ वारा
कळते मज तू रिमझिम धारा
... कधी दूरचा पहाटतारा
तव रूप कसेही छळते रे!

ही कविता आणि 'गीतगंगेच्या तटावर' व 'कलंदराचे गीत'  अशा काही रचना तीन तीन ओळींची कडवी असलेल्या आहेत, हे समजलं.
एव्हाना 'रंग माझा वेगळा'ची पारायणं झालेलीच होती... मग अशाच रचनाबंधात आपणही लिहावं, अशी नोंद अबोध मनानं कुठंतरी घेतलेलीच असणार... (वृत्तबद्ध, छंदोबद्ध कवितेनं तर आधीच दंश करून ठेवलेला होता... ते 'विष' मनात चांगलंच भिनत गेलेलं होतं...! ) मग स्फुरलं की लिहीत गेलो अशा तीन तीन ओळींची कडवी असलेल्या कविता. अशा कितीतरी कविता लिहिल्या. नंतर त्यातील अनेकींचे कागदांचे बोळे झाले आणि कोपऱ्यात गपगुमान पडून राहिले!

माझ्या तीन तीन ओळींच्या कवितांमागचे 'रहस्य' हे असे असावे. नव्हे; आहेच! सुरेश भट, ना. घ. देशपांडे आणि राजेंद्रकृष्ण या तीन कविवर्यांना त्याचे संपूर्ण श्रेय जाते. रचनाबंधाच्या दृष्टीने, भावाभिव्यक्तीच्या दृष्टीने, आशयसमृद्धीच्या दृष्टीने, अर्थसंपन्नतेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या कविता कुणी लिहाव्यात, तर त्या केवळ भटसाहेबांनीच लिहाव्यात, असे मत हळूहळू बनत गेले...
या सगळ्याच कवींचे ऋण माझ्यावर आहे... राहील!

.......
विषयांतर -  :) 

टीन एजच्या त्या काळात 'गीतकार है राजेंद्रकृष्ण' ही ओळ विविध भारतीवरून वारंवार कानांवर पडायची... इतरांचीही गाणी लागायचीच; पण का कुणास ठाऊक मला सारखं सारखं ऐकू यायचं ते हेच नाव ! त्यांची गाणी ऐकून ऐकून मलाही वाटायला लागलं की, आपणही यांच्यासारखीच गाणी लिहायची आणि मग आपलंही नाव आकाशवाणीवर असंच ऐकू येणार - गीतकार प्रदीप कुलकर्णी!
(...शेवटी, टीन एजच ते! खुळचट स्वप्नं असतातच काहीतरी त्या काळात आपली !!!).... पण काहीएक गांभीर्याने व कवितेची खरीखुरी जाण आली आणि जशा कविता-गाणी लिहायला लागलो, तेव्हापासून असेच वाटत आले आहे - आणि अगदी ठामपणे वाटत आले आहे की- कुणी संगीतबद्ध करेल म्हणून कविता, गाणी लिहायची नसतात... लिहू नयेत. लिहिताना त्याबाबतचा विचारच करू नये. त्याच अवस्थेत अशी एक कविता लिहून झाली होती... तिची सुरुवात अशी -

गाणे लिहून जावे; मागे सरू नये!
गाईल कोण, याची चिंता करू नये!


प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, आजानुकर्ण.

- प्रदीप कुलकर्णी