दादाने निवृत्ती जाहीर केली हे चांगलंच झालं. म्हणजे अगदी मुहूर्ताला नाही तरी मुहूर्ताची घटिका सरण्यापूर्वी का होईना पण लग्न लागलं!

याचा अर्थ तो मला आवडत नाही असा मुळीच नाही. उलट इतका आवडतो की स्वतःच्याच करणीने वाट्याला आलेली एवढी मानहानी पाहीपर्यंत तो का अडेलतट्टूपणा करत राहिला याचा विषाद वाटतो. हाच प्रश्न सचिन आणि द्रविडच्या बाबतही पडलेला आहे! यासंदर्भात धूम २ चित्रपटातलं ऋतिक रोशनच्या तोंडचं एक वाक्य आठवतं नेहमी- "क्या कोई किसीसे इतना प्यार कर सकता है कि उसे बचाने के लिये उसकी जान ले ले?" खरच असं करणं शक्य असतं तर मी या तिघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून केव्हाच मारून टाकलं असतं! म्हणजे आजच्यासारखे चर्चेचे प्रसंगच आले नसते!

खरंतर सचिनशी असलेल्या वैरामुळे दादा आधी मला आवडत नसे. पण कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर काय पडली आणि त्याचा पार कायापालटच झाला! सौरवइतका सकारात्मक, आक्रमक, आणि द्रष्टा नेता त्यापूर्वी भारतीय क्रिकेटला मिळालाच नव्हता. अगदी कपिलसुद्धा नाही. आणि आत्ता धोनी आहे पण तरी सौरव तो सौरवच.

त्याचा ऍटिट्यूड आणि टेंपरामेंट नुसता बघून घ्यावासा असायचा; मैदानावर आणि बाहेरसुद्धा! त्या कर्णधाराकडे बघून वाटायचं की हा जिंकायला लायक आहे. अनेक संस्मरणीय विजय त्याने मिळ्वून दिले आहेत. भरात असतानाची त्याची फलंदाजी-गोलंदाजी, मतभेद मैदानाबाहेर ठेवून त्याने आणि सचिनने रचलेल्या उत्तुंग भागीदाऱ्या, एकाहाती मिळवून दिलेले विजय, आणि टक्कर घेण्याची, रिस्क घेण्याची आत्मविश्वासपूर्ण घमेंड ह्या नुसत्या अंगावर शहारा आणायच्या!

आपल्यातल्या या सगळ्या गुणांना न्याय देण्यासाठी, त्यांचा मान राखून घेण्यासाठी तरी त्याने आणि त्यानेच काय सचिन आणि द्रविडने सुद्धा केव्हाच निवृत्त व्हायला हवं होतं. आपली कारकीर्द आपल्या मस्तीत आणि तंदुरुस्त शरीराने संपवायला हवी होती! पण ते होणे नव्हते असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. दुसरं आपल्या हातात तरी काय आहे?

आपली पिढी या तिघांबरोबरच मोठी झाल्यामुळे त्या सोनेरी दिवसांमधल्या बऱ्याचशा रोमहर्षक क्षणांचं श्रेय निःसंशयपणे या लोकांना जातं. हे खरंय. त्यांतल्या काही क्षणांचं अत्यानंदात, काहींचं दुःखात-वैतागात तर काहींचं चक्क शिविगाळ आणि दगडफेकीतही पर्यवसान झालेलं पाहिलं. शंभरदा एक एक मॅच चघळली. वाद घातले. चर्चा रंगवल्या. ऱाहुल का सचिन का सौरव अशा पैजा लावल्या. आपण सारे हे त्रिदेवांचं पर्व मनापासून जगलो......

सौरवच्या निवृत्तीनं या त्रिदेव पर्वाच्या अस्ताचा आरंभ झालाय. ते पूर्ण लयाला जाणं सुद्धा आता फार लांब नाही. पण ते कीर्तिरूपे तरी उरावं अशी आशा आहे. ती पूर्ण करणं न करणं हे फक्त त्यांच्याच हातात आहे....!

ते एक असो. तिघंजण होतील तेव्हा होतील निवृत्त! आपण यांना निवृत्त व्हा, निवृत्त व्हा, म्हणायचं खरं पण खरंच उद्या घेतली निवृत्ती तर पुढे काय? म्हणजे त्यांचं काय किंवा क्रिकेटचं काय नव्हे! आपलं काय? या तिघांच्या पश्चात मी मॅच बघणार का? क्रिकेट मला यांच्यापासून वेगळं काढता येईल का? धोनी आणि मंडळी उत्तम आहेत पण तरी सचिन-सौरव-राहुल या त्रिकुटाची चटक लागलेल्या डोळ्यांना तो संघ भावेल का? ते म्हणतात ना, When you start with the best, you lose hopes for future!  आणि ही आपली डोकेदुखी असते. नवं चांगलं घडत राहणारच असतं; नवी माणसं येणारच असतात, नवे विक्रम घडणार-मोडणारच असतात, आपणही त्यांचं कौतुक करणारच असतो पण तरीही.... आपणच आपल्या हौशीने "आपल्या" काळात रमतही राहतो!