अमृत, रसरंग आणि उद्यम.

संग्राहकांनी अमृतबद्दल सध्याची माहिती विचारुन आमच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे. अंदाजे ३०/३५ वर्षापुर्वी अमृत, रसरंग आणि उद्यम ही मासिके नाशिकमधुन "गांवकरी" वर्तमानपत्राचे मालक, संपादक  दादासाहेब पोतनीस प्रसिध्द करीत असत. "अमृत" हे ज्ञान आणि मनोरंजन. "रसरंग" हे चित्रपटातील चित्रपटाची माहिती, त्यातील तारे आणि तारकांच्या माहितीसाठी आणि "उद्यम" हे मराठीतील युवकांना व्यवसाय विषयक माहितीसाठी वाहीलेले अशी मासिके होती.
माझ्या माहितीप्रमाणे उद्यम १९८० च्या सुमारास ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी बंद पडले, रसरंग आणि अमृत अद्यापही चालू आहेत अथवा असावीत असे वाटते.
"अमृत" हे इंग्रजीच्या रीडर डायजेस्टच्या धर्तीवर होते आणि त्याला त्या काळी उत्तम प्रतिसाद ही मिळत असे. आज मला असे वाटते की अमृतचा छपाईचा दर्जा चांगला नव्हता. वर्तमानपत्राचा असणारा कागदच मासिकासाठी वापरला जाई. त्यामुळे आजकाळच्या रंगीत आणि गुळगुळीत कागदासमोर "अमृत" ची गुणवत्त्ता असुनही दर्जा टिकणारा नव्हता असेच खेदाने नमुद करावे लागेल.
त्याही पलिकडे हिंदी मासिके ( चंपक इत्यादी प्रमाणे) वितरणव्यवस्था नव्हती. दुर्देवाने मराठी मासिके बस स्थानके अथवा रेल्वे स्थानकांवर का उपलब्ध होत नाही आणि माफक मुल्यात का मिळत नाही हा मला नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे.
मासिकांच्या मुख्यपृष्ठावरील किंमती बघुनच मासिके मी हातात घेत नाही हाच माझा अनुभव आहे.
या सुट्टीमध्ये मी नाशिकला जाणार आहे आणि या मासिकांना भेट आणि मनोगत कडुन शुभेच्छा देईल.
बरेच विषयांतर केलेले असले तरी जाणकारांना ही माहिती आवडेल अशी अपेक्षा आहे.

द्वारकानाथ
( माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास जाणकारांनी त्यात सुधारणा करावी ही विनंती.)